‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई

करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू झाल्याने मुंबई महानगर क्षेत्रातील सुमारे ५० लाख कामगार-कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तणावग्रस्त आहेत. पहिल्या लॉकडाउननंतर सावरण्याचा प्रयत्न करणारे १० लाख कारखाने पुन्हा लॉकडाउन झाल्यास बंदच पडण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रात ठाणे व नवी मुंबई पट्ट्यात मोठ्या प्रमाणात लघु, तसेच मध्यम कारखाने आहेत. तर मुंबई शहर आणि उपनगरांत अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. ही कार्यालये व कारखान्यांची संख्या जवळपास १० लाखांच्या घरात आहे. यामध्ये जवळपास ८० लाख कर्मचारी कार्यरत आहेत. यातील जीवनावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता उर्वरित सर्व कामगारांना लॉकडाउनदरम्यान घरी थांबावे लागले. त्यांचा आकडा सुमारे ७० ते ७२ लाख इतका होता. यापैकी १२ ते १५ टक्के कामगारांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. त्यानंतरही लघु व मध्यम उद्योग क्षेत्राने मोठ्या हिमतीने मागील व्यवसाय पूर्ववत केला आहे. त्यात त्यांना निम्मे यश आले आहे. पण, त्यात आता पुन्हा लॉकडाउन होत असल्यास हे क्षेत्र संकटाच्या दरीत कोसळेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

एसएमई चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना लॉकडाउनसंदर्भात भीती व्यक्त केली. ते म्हणाले, ‘लॉकडाउननंतर आत्तापर्यंत २५ ते ३० टक्के उद्योग हिमतीने उभे राहिले. सुमारे ४५ ते ५० टक्के रोजगार कसाबसा वाचला. आता पुन्हा लॉकडाउन झाल्यास सर्वाधिक रोजगार देणाऱ्या लघु व मध्यम उद्योग क्षेत्राची अवस्था बिकट होईल. आधीच इतक्या संकटानंतर या क्षेत्राला राज्य सरकारकडून अद्याप कुठलेही सहकार्य मिळालेले नाही. त्यात पुन्हा लॉकडाउन लागणे हे या क्षेत्रासाठी, त्यातील रोजगारासाठी व या कर्मचारी, काममारांवर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांसाठी न परवडणारे आहे. त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल.’

३ कोटी रोजगार कात्रीत

राज्यभरात जवळपास १९ लाख सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग कारखाने आहेत. तर ६ हजार मोठे कारखाने आहेत. १९ लाख लहान कारखान्यांमधील रोजगाराचा आकडा तीन कोटी आहे. एवढ्या मोठ्या रोजगाराला लॉकडाउनचा जबर फटका बसेल. पुन्हा आर्थिक संकट आल्यास बँकादेखील आता कंपन्या, कर्मचारी, पगारदार, व्यापारी यांच्यासाठी धावून येणार नाहीत. संपूर्ण अर्थव्यवस्थाच ठप्प होईल, अशी भीती लघु उद्योग क्षेत्राकडून व्यक्त होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here