म. टा. प्रतिनिधी, : दारू पार्टीनंतर दोन सराईतांमध्ये पाटील इस्टेटचा भाई कोण, यावरून मारामारी झाली. यात एकमेकांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला असून, ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोघांनी तक्रार दिल्यानंतर खडकी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर परिसरात दहशत निर्माण झाली होती.

याबाबत जखमी आकाश हनवते (वय २५, रा. पाटील इस्टेट) याने दिलेल्या तक्रारीवरून खडकी पोलिसांनी अक्षय पवार (२६) आणि त्याच्या बहिणीला अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश व अक्षय दोघेही बालपणीचे मित्र आहेत. दोघे बिगारी काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्यात काही दिवसांपूर्वीच किरकोळ कारणावरून वाद झाले होते. रविवारी रात्री दोघांनी मद्यपान केल्यानंतर पुन्हा वाद सुरू केले. अक्षयने रागाच्या भरात घरातून कोयता आणला. ‘मी पाटील इस्टेटचा दादा आहे,’ म्हणून परिसरात दहशत पसरवली. यानंतर आकाशच्या दिशेने अक्षय व त्याची बहीण पळत गेली. अक्षयच्या बहिणीने आकाशला मागून घट्ट पकडले. यानंतर अक्षयने आकाशच्या गळ्यावर व कपाळावर धारदार कोयत्याने वार केले. आकाशला वाचावायला दादा दुबळे मध्ये पडले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. अक्षय पवारने दिलेल्या तक्रारीनुसार आकाश हनवते याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

कोयता मारून केले जखमी

अक्षय जिमच्या दिशेने जात असताना आकाश हातात कोयता घेऊन आला आणि त्याने शिवीगाळही केली. त्या वेळी अक्षयने त्याला हटकले असता आकाशने त्याच्या मांडीवर व हातावर कोयता मारून जखमी केले. या वेळी अक्षयच्या आई व बहिणीला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक वैशाली सुळे करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here