काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज दिल्लीत खासगी रुग्णालयात निधन झालं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी अहमद एक होते. काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर त्यांचा प्रभाव होता. त्यांच्या निधनानं काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेससह विविध पक्षातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
‘अहमद पटेल हे कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते, राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहिर होते, पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच ह्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते,’ असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहलं आहे.
‘राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुखां:च्या प्रसंगात ते ठाम उभे राहत ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. ४३ वर्ष सक्रिय राजकारणात राहून आणि अहमद पटेल यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वत:सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळचं,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times