‘शिक्षणातील १२ टक्के मराठा आरक्षण रद्द करून पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने काल घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रशासन चालवण्याचा अनुभव नाही. त्यांच्याकडे राज्य चालवण्याची क्षमता नाही. सर्वांना खेचून नेण्याची हातोटी नाही, माहिती घेण्याची इच्छा नाही. त्यामुळे विश्वासघात करून मुख्यमंत्री झालेले ठाकरे हे केवळ पक्ष चालवू शकतात, राज्य नव्हे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांना साधा नगरसेवक पदाचाही अनुभव नसल्याने त्यांनी फक्त संघटनेचे काम करावे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
ते अकार्यक्षम आहेत म्हणून त्यांचा राजीनामा मागणार का असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, ‘आम्ही त्यांचा राजीनामा मागणार नाही. पण, त्यांनीच आता सक्षम नेतृत्वाच्या हातात कारभार द्यावा. राज्याचा सध्या जो कारभार सुरू आहे ते पाहता शरद पवार तरी राज्य चालवतात का अशी शंका येत असल्याचा चिमटा त्यांनी काढला.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबतही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘भाजपने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, त्याला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळून वर्ष झाले तरी हे सरकार कोणतीही कार्यवाही करत असल्याचे दिसत नाही. मुळात या सरकारमधील कोणत्याही नेत्याला मराठा आरक्षणाबाबत चिंता नाही, जिद्द नाही. यामुळे हा प्रश्न रखडला आहे.
महावितरणमधील नोकर भरतीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना आरक्षणाचा मुद्दा पुढे करत नव्याने नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी शिक्षणातील काही शाखांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती, ती सर्व प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.
‘महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना आरक्षण मिळावे असं वाटतच नाही, ओबीसी ची हॉट बँक त्यांना दुखवायचं नाही. केवळ खुर्ची टिकवण्यासाठी ते मराठा समाजावर अन्याय करत आहेत. याविरोधात सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या समाजाने भाजपकडे नेतृत्व दिल्यास आम्ही सरकारला सळो की पळो करून सोडू,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी काल भाजप वर आरोप केला होता. शंभर नावे आहेत, ती देतो त्यांच्यावर कारवाई करा असे आव्हान त्यांनी दिले होते. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘खुशाल नावे द्या. तुमचे हात कुणी धरले नाहीत. कंगना आणि अर्णवच्या प्रकरणात ही तुम्हाला कोणी अडवले नव्हते. आम्ही घाबरत नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे,’ आव्हानही त्यांनी दिले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times