मालेगावात गर्भपाताच्या औषधांच्या साठ्याची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आझादनगर पोलिसांनी औषध साठ्याची वाहतूक करणाऱ्या रिक्षावर पाळत ठेवली. आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही रिक्षा जात होती. रिक्षाच्या मागेच एक जण दुचाकीवरून जात होता. तो आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग सुरूच ठेवला. पोलिसांना पाहिल्यानंतर दुचाकीवरील संशयित फरार झाला.
बराच वेळ पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी रिक्षा रोखली. त्यात क्लिनकीट (कॉम्बिकिट ऑफ मिफेप्रीस्टोन अॅण्ड मिसोप्रोस्टल टॅब) या गोळ्यांचे प्रत्येकी ६०० रुपये किंमतीचे १५० किट्स आढळून आले. या साठ्याची किंमत ९० हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयातील औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकार यांच्यासह पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडे विचारणा केली असता, त्याच्याकडे या गोळ्या विकण्यासाठीचा कुठलाही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच या औषध साठ्याचे बिलेही सापडली नाहीत.
पोलिसांनी या प्रकरणी आबिद आमिन या संशयित आरोपीस अटक करून आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड करीत आहेत.
प्रीस्क्रिप्शनशिवाय विकण्यास बंदी
गर्भपाताची औषधे विकण्यास परवानाधारक विक्रेत्यांनाच परवानगी आहे. इतर औषधांप्रमाणे या औषधांची खुली विक्री करण्यास बंदी असून, स्त्री-रोगतज्ज्ञ डॉक्टरने शिफारस केली असेल, तरच ती संबंधित रुग्णाला विक्री करण्याची परवानगी आहे. या औषधांची किती विक्री झाली? कोणाला विकले याची नोंद ठेवून ती माहिती आरोग्य विभागाला द्यावी लागते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times