म.टा. प्रतिनिधी, नगरः बिबट्याच्या नावाने अनेकांचा थरकाप उडतो. मात्र एका ऐतिहासिक स्मारकाच्या जवळ असणाऱ्या परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यानंतर, त्याचा नकळतपणे हे स्मारक संरक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाला फायदा झाला आहे.

नगर शहरापासून जवळच डोंगरावर चांदबीबी महाल आहे. हा महाल पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात. तसेच दररोज सकाळी महालाच्या परिसरात फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. परंतु करोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर हा महाल १६ मार्चला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. तसेच महालाच्या भोवती असणाऱ्या संरक्षक भिंतीचे गेट देखील बंद करण्यात आले.

अनलॉक सुरू झाल्यानंतर हळूहळू पुन्हा एकदा चांदबीबी महाल परिसरात पर्यटकांचा वावर वाढू लागला. या पर्यटकांकडून येथील गेट उघडून आत मध्ये जाऊ देण्याची विनंती करण्यात येऊ लागली. परंतु जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येणार नाहीत, तोपर्यंत महाल पर्यटकांसाठी खुला करणार नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे अनेकदा काही अतिउत्साही पर्यटक महालाच्या बंद गेट वरून उडी मारत आत प्रवेश करीत असत. त्यावरून वादही होत होते.

मात्र आता चांदबीबी महालाच्या परिसरातच बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वनविभागाने या भागात पर्यटक आणि पहाटे डोंगरावर फिरायला येणाऱ्या नागरिकांनी येणे टाळावे, असे आवाहन केले आहे. तसेच नुकतेच नगर जिल्ह्यात तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भीतीपोटी गेल्या दोन दिवसापासून चांदबीबी महालाच्या परिसरात जाणाऱ्या पर्यटकांची व दररोज सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. महालाकडे येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाल्याने परिणामी त्याचा नकळतपणे फायदा पुरातत्व सर्वेक्षण विभागाला झाला आहे. पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

पिंजरा लावण्यास आहे अडचण

चांदबीबी महालाच्या परिसरात बिबट्याचा अख्खं कुटुंबच वावरत असल्याचे समोर आले. मात्र या भागातील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला पिंजरा लावण्यात अडचणी आहेत. याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे म्हणाले, ‘मुळात महालाच्या बाजूला असणारे क्षेत्र हे वनविभागाचे आहे. या भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे दिसतंय. त्यामुळे आम्ही तेथे फलकही लावले आहेत. मात्र या भागात पिंजरा लावता येणार नाही. कारण जर पिंजऱ्यामध्ये बिबट्याचे पिल्लू अडकले, तर त्यांच्यासोबत असणारी मादी पिसाळून आक्रमक होऊ शकते. त्यामुळे सध्या तरी गस्त घालणे व लोकांनी खबरदारी घेणे, हाच पर्याय आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here