नागपूरः शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने आज २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात तुकाराम मुंडे यांचा समावेश आहे. परंतु, नागपूर महापालिका ही भाजपच्या ताब्यात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक तुकाराम मुंडे यांना नागपूरला पाठवल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.

तुकाराम मुंडे हे या आधी एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर कार्यरत होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. तुकाराम मुंडे ज्या पालिका आयुक्तपदी जातात. त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना ते काम करू देत नाही, असा त्यांच्यावर आरोप केला जातो. सत्ताधाऱ्यांना चुकीची कामे करण्यापासून रोखणाऱ्या व महापौरांना न जुमनणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक तुकाराम मुंडे आहेत. आता भाजपाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरचेच असून त्यांना अडचणीत आणण्यासाठी उद्धव सरकारने ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

मुंडे यांची महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागांमध्ये बदली झाली असून, त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्दावरुन त्यांचा नेहमीच राजकारण्यांबरोबर संघर्ष झाला आहे. नाशिक, नवी मुंबई महापालिकेत सर्वपक्षीय राजकारणी त्यांच्याविरोधात एकत्र आल्याचे याआधी दिसलेले आहे. राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची खासियत आहे. त्यामुळेच राजकारण्यांना जरी ते नकोसे वाटत असले तरी, सर्वसामान्यांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत. काही ठिकाणी तुकाराम मुंढे यांची बदली रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे. आता भाजपच्या बालेकिल्ल्यात तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आल्याने ते कोणते धडाकेबाज निर्णय घेतात हे नागपूरकरांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here