सांगली: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ( ) महाविकास आघाडी आणि भाजपचे उमेदवार सांगली जिल्ह्यातील आहेत. राष्ट्रवादीचे अरुण लाड ( arun lad ncp ) आणि भाजपचे संग्राम देशमुख ( sangram deshmukh bjp ) यांच्या लढतीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्हीकडून प्रचार तापल्याने गावपातळीपर्यंत याचे पडसाद उमटू लागले आहेत. अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत भाकिते केली जात आहेत, तर पैजाही लावल्या जात आहेत. यामुळे जिल्ह्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे.

पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत प्रमुख लढतीचे दोन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदार संघातील आहेत. ही लढत केवळ अरुण लाड आणि संग्राम देशमुख यांच्यातील राहिलेली नाही, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी उमेदवार जाहीर करतानाच त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे. यामुळे प्रचारासाठी दोन्ही प्रदेशाध्यक्ष आघाडीवर आहेत. जाहीर सभा, कार्यकर्ता मेळाव्यांपासून ते स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दोन्ही नेत्यांची धावपळ सुरू आहे. प्रमुख नेत्यांच्या बैठका घेऊन प्रचाराच्या सूचना दिल्या जात आहेत. जास्त मतदान असलेली गावे आणि शहरांवर विशेष नजर ठेवून मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सांगली जिल्ह्यात दोन्हीकडील स्थानिक नेत्यांनीही प्रचाराच्या रणधुमाळीत सक्रीय सहभाग घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

प्रचाराच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजपकडून विरोधी उमेदवारांचे प्रतिमाहनन करण्याचेही काम सुरू आहे. ‘राष्ट्रवादीच्या उमेदवाराने कोणताही साखर कारखाना बंद पाडला नाही. शेतक-यांचे पैसे बुडवले नाहीत,’ असे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे उमेदवार संग्रम देशमुख यांना टोला लगावला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, ‘७४ वर्षीय अरुण लाड वयामुळे पाच जिल्ह्यातील मतदारांपर्यंत कसे पोहोचणार?’ असा प्रश्न उपस्थित केला. तसेच येणा-या विधानसभा निवडणुकीत इस्लामपूरमधून जयंत पाटील कसे निवडून येतात पाहूच, असे म्हणत आव्हान दिले. कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील नेतेही प्रचारासाठी सांगलीत हजेरी लावत आहेत. यामुळे पुणे पदवीधर मतदार संघात सध्या सांगली जिल्हा घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे.

समर्थकांकडून भाकिते अन् पैजाही

लाड आणि देशमुख या दोन्ही उमेदवारांचे नातेवाईक, पै-पाहुणे, संस्थांमधील कर्मचारी, समर्थक प्रचारात उतरले आहेत. दोन्हीकडून आमचाच उमेदवार जिंकणार असे दावे केले जात आहेत. कोणत्या जिल्ह्यात किती मतदान होईल आणि किती मतांनी उमेदवार निवडून येईल याची भाकितेही केली जात आहेत. निवडणुकीच्या निकालावरून कुंडल आणि कडेपूर या उमेदवारांच्या गावांमध्ये पैजाही लागल्या आहेत.

जिल्ह्यातील बारावा आमदार कोण?

सांगली जिल्ह्यात विधानसभेचे आठ आमदार आहेत. यापैकी जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्रीपद आहे, तर कॉँग्रेसचे विश्वजीत कदम यांच्याकडे कृषी राज्यमंत्रीपद आहे. मोहनराव कदम, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे तिघे विधान परिषदेचे आमदार आहेत. आता पुणे पदवीधरसाठी सांगलीतीलच दोन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होत असल्याने जिल्ह्यातील बारावा आमदार कोण असेल? याची चर्चा सुरू झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here