केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगारांसंदर्भातील धोरणांच्या निषेधार्थ १० केंद्रीय कामगार संघटनांनी आज, गुरुवारी देशव्यापी संपाची हाक दिली असून, मुंबईत बँकांतील व्यवहारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मुख्यतः काँग्रेस व डाव्या पक्षांशी संबंधित कामगार संघटनांनी या संपाची हाक दिली आहे. मुंबईचा विचार करता वाहतूक, तसेच बहुतांश सेवांवर या संपाचा परिणाम होण्याची फारशी शक्यता नाही. मात्र, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे पाच लाखांहून अधिक सभासद या संपात सहभागी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जुन्या खासगी बँका, ग्रामीण आणि सहकारी बँकांमधील कर्मचारी या संपात सहभागी होतील. त्यामुळे बँकांच्या व्यवहारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षण बचाव संयुक्त मंचाअंतर्गत शिक्षक भारती, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनने (एमफुक्टो), बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन (बुक्टु) व इतर संघटना या देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत. सध्या शाळांचे वर्ग ऑनलाइनच सुरू आहेत. त्यांना संपाचा फटका बसण्याची शक्यता नाही, असे सांगण्यात आले.
मुंबईत संपाचा मोठा परिणाम होईल, अशी चिन्हे नसली तरी पुण्यासारख्या शहरात रिक्षा वाहतुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुण्यातील बाजारांतही त्याचा परिणाम दिसेल. नाशिक जिल्ह्यातही असा परिणाम दिसू शकतो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times