मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर हिच्या आत्महत्येची फाइल मुंबई पोलिसांनी बंद केल्यानंतर दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे.

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी दिशा सालियन हिनं घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर उठलेल्या वादळानंतर दिशाच्या आत्महत्येची नव्यानं चर्चा सुरु झाली होती. तिच्यावर लैंगिक आत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याचा संशय काही जणांनी व्यक्त केला होता. मात्र, पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येचा प्रकरणाचा तपास पुराव्याआभावी थांबवला होता. तसंच, सुशांतप्रमाणे दिशाच्या आत्महत्येचा तपासही सीबीआयकडे सोपवावा अशी विनंती जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. आज ही याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे.

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येच्या कारणामुळे अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, मृत्यू संशयास्पद असल्याविषयी कोणालाही काही माहिती असल्यास ती सादर करावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी याप्रश्नी प्रसिद्धीपत्रक जारी करून ऑगस्टमध्ये केले होते. मात्र, तरीही याचिकादार विनीत धांडा यांनी पोलिसांकडे कोणतीही माहिती दिली नव्हती. त्याऐवजी हायकोर्टाला सुओ मोटो दखल घेऊन सीबीआयकडे तपास सोपवण्याची विनंती याचिकेत केली.

या प्रश्नी मुंबई हायकोर्टानं महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ही याचिका आम्हाला सुनावणीयोग्य वाटत नाही. त्यामुळे ती फेटाळण्यात येत आहे. नागरिकांपैकी कोणाकडेही काहीही माहिती असल्यास ते पोलिसांना देऊ शकतात’, असे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने अॅड. विनीत धांडा यांनी केलेली जनहित याचिका फेटाळताना आदेशात स्पष्ट केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here