मुंबई:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाअधिवेशन अवघ्या दोन दिवसांवर आलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने आज आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्घोष करणारा व्हिडिओ पोस्ट करत हिंदुत्वाच्या दिशेने चाललेल्या पक्षाच्या वाटचालीवर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, पक्षाच्या ट्विटर हँडलवरून तीन रंगांचा ध्वजही गायब झाला असून, केवळ निवडणूक चिन्ह असलेलं इंजिन राहिलं आहे. पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याचंही यामुळे निश्चित मानलं जात आहे.

मनसेचं अधिवेशन २३ जानेवारी रोजी गोरेगाव येथील एनएसई ग्राउंडवर होणार आहे. या भव्य अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे. राज्यातल्या सत्तांतरानंतर शिवसेनेच्या भगव्याची किनार काँग्रेसशी बांधलेल्या संधानामुळे काहीशी सेक्युलर झाली आणि त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी म्हणजेच शिवसेनेचं हिंदुत्व जणू हायजॅक करण्यासाठी पक्षाचा झेंडा आणि भूमिकाही काहीशी बदलणार असल्याचं मानलं जात आहे.

हिंदवी स्वराज्याचा निर्धार या व्हिडिओच्या माध्यमातून मनसेने केला आहे. यातून या महाअधिवेशनातील यांच्या भाषणाचा रोख कसा असेल ते लक्षात येत आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्व, समान नागरी कायदा याबाबत राज ठाकरे काय भूमिका मांडणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. त्याची चुणूक या व्हिडिओतून मिळत आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी हा मेळावा होत असल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here