अहमदनगर: सरकारी कार्यालयातून मागण्या मान्य करून घेण्यासाठी अनेकदा अनोखी आंदोलने केली जातात. बीड जिल्ह्यातील पाटोदा तहसिदार कार्यालयासमोरही एका युवकाने असेच वेगळे आंदोलन केले.

युवकाला स्वतंत्र रेशनकार्ड हवे होते. मात्र, नियमावर बोट ठेवत प्रशासनाने त्याला एकट्यासाठी रेशनकार्ड देता येत नसल्याचे सांगितले. त्या युवकाचे लग्न झालेले नाही. त्यामुळे त्याने तहसिलदार कार्यालयासमोर वरात आणून रेशनकार्ड नाही तर मला बायको मिळवून द्या, अशी मागणी करीत आंदोलन केले. अखेर त्याला रेशनकार्ड देण्यात आले. पटोदा तहसिलदार कार्यालयासमोर आज गुरूवारी हे अनोखे वरात आंदोलन झाले. वंचित बहुजन आघाडीने त्याला पाठिंबा दिला होता.

यासंबंधी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. अरुण जाधव यांनी सांगितले की, पाटोदा येथील अमित आगे या सुशिक्षित बेरोजगार युवकाला एका कामासाठी स्वतंत्र रेशनकार्ड हवे होते. त्याने यासंबंधी रितसर मागणी केली असता, एकट्यासाठी रेशनकार्ड देता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्याचे लग्न झालेले नाही, त्यामुळे कुटुंबातील अन्य नावे कशी दाखवणार. त्यामुळे प्रशासनाच्या या आडमुठ्या नियमाविरूद्ध अनोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बायको नसल्याने रेशनकार्ड मिळणार नसेल तर आधी बायको मिळवून देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले. आगे याच्या लग्नाची काल्पनिक निमंत्रण पत्रिकाही तयार करून व्हायरल करण्यात आली. एखाद्या लग्नाच्या तयारीने यावे असे कार्यकर्ते फेटे बांधून तर स्वत: आगे नवरदेवाप्रमाणे कपडे परिधान करून आला होता. त्याची मिरवणूकही काढण्यात आली.

या आंदोलनानंतर प्रशासनाने त्याची लगेच दखल घेत अमित आगे याला हवे असलेले रेशनकार्ड दिले. बायको मागण्यासाठी आलेला आगेच्या हातात शेवटी त्याला हवे असलेले रेशनकार्ड पडले. यावेळी बोलताना अॅड. जाधव म्हणाले की, तालुक्यात अशी एकट्याच्या नावावर अनेकांना रेशनकार्ड देण्यात आलेली आहेत. मात्र, आगे याची अडवणूक करण्यात येत असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आमच्याशी भेदभाव केला जात असल्याने आम्ही हे आंदोलन केले. आता कसे का होईना आगे याला रेशनकार्ड मिळाले याचा आनंद आहे. यापुढे दुसऱ्या कोणासाठी आम्हाला असे वऱ्हाड घेऊन येण्याची वेळ येणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, असेही अॅड. जाधव म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here