नवी दिल्ली : अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे काल (बुधवारी) निधन झाले होते. मॅरेडोना यांना आपल्या कारकिर्दीत बरेच मान-सन्मान आणि पुरस्कार मिळाले. पण निधनानंतरही त्यांचा सन्मान अर्जेंटीनाने केला आहे. मॅरेडोना यांचे पार्थिव राष्ट्रपती भवनच्या प्रांगणात ठेवण्यात आले आहे. हा एक मोठा सन्मान समजला जातो. मॅरेडोना यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रपती भवनाचे दरवाजे तीन दिवस सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत.

मॅरेडोना यांचे पार्थिव आज सकाळी अर्जेंटीनाच्या राष्ट्रपती भवनच्या प्रांगणात आणण्यात आले. मॅरेडोना यांच्या पार्थिवावर अर्जेंटीनाचा राष्ट्रीय ध्वज ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर मॅरेडोना यांनी सही केलेले देशाचे १० क्रमांकाचे टी-शर्टही यावेळी मॅरेडोना यांच्याजवळ ठेवण्यात आले होते. त्यानंतर मॅरेडोना यांच्या चाहत्यांनी राष्ट्रपती भवनामध्ये एकच गर्दी केली होती. मॅरेडोना यांच्या चाहत्यांना यावेळी शोक अनावर झाला होता. मॅरेडोना यांचे बरेच चाहते रडत होते आणि त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आसूसलेले होते. यावेळी पोलीसांची मात्र मॅरेडोना यांच्या चाहत्यांना सांभाळण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

काल मॅरेडोना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि क्रीडा विश्वावर शोककळा पसरली होती. मॅरेडोना यांना दोन आठवड्यांपूर्वीही ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण आज पुन्हा एकदा मॅरेडोना यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

मॅरेडोना यांनी १९८६ चा वर्ल्ड कप अक्षरश: गाजवला. त्या आधी ते १९८२ चा वर्ल्ड कपमध्येही खेळले होते, पण त्यांचा तितकासा प्रभाव दिसला नव्हता. त्या स्पर्धेत अर्जेंटिनाने गोलच्या दिशेने डागलेल्या शॉट्सपैकी निम्मे मॅराडोना यांचे होते, संपूर्ण स्पर्धेत त्यांनी एकूण ९० खेळाडूंना चकवले, ५ गोल स्वत: केले, ५ गोलसाठी पास दिले. समोरच्या संघाला मॅराडोना यांची इतकी दहशत होती, की या स्पर्धेत त्यांच्याविरोधात ५३ फाउल झाले. याच स्पर्धेमध्ये इंग्लंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यातील अर्जेंटिनाचा पहिला गोल गाजला, तो ‘हँड ऑफ गॉड’ म्हणून. याचे अनेक किस्से प्रसिद्ध झाले आहेत; पण याच सामन्यातला जो दुसरा गोल मॅराडोनाने केला, तो गेल्या शतकातील सर्वोत्तम गोल म्हणून निवडला गेला, हे कोणीही विसरू शकणार नाही. इंग्लंडचा गोलरक्षक पीटर शिल्टनला चकवा देऊन गोलजाळ्यात चेंडू धाडण्याआधी मॅराडोना यांनी मैदानाचा अर्ध्याहून अधिक भाग एकट्याने चेंडू घेऊन जात पाच इंग्लिश खेळाडूंना चकवले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here