सहा तास चाललेल्या या बैठकीत आरोप प्रत्यारोबरोबरच अनेकदा शाब्दिक चकमकी उडाल्या. चित्रपट महामंडळाच्या संचालकांत गेले अनेक महिने वाद सुरू होता. उपाध्यक्ष आणि अध्यक्षांनीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याने हा वाद टोकाला गेला होता. या वादातून अखेर अध्यक्ष भोसले यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला. उपाध्यक्ष यमकर व संचालक बाळ जाधव यांचे संचालकपद स्थगित करण्याचा ठराव विषयपत्रिकेवर होता, पण तो ठराव येण्यापूर्वीच अध्यक्षांचीच हकालपट्टी करण्यात आली. यामुळे यमकर यांनी भोसले यांच्यावर कडी केल्याचे स्पष्ट झाले.
दुपारी संचालक मंडळाची बैठक सुरू होताच बहुसंख्य संचालकांनी अध्यक्षांच्या मनमानी कारभारावर टीका करण्यास सुरुवात केली. यामुळे गोंधळास सुरुवात झाली. अध्यक्ष मनमानी कारभार करत आहेत, चित्रपट महामंडळास त्यांनी महाकलामंडळाच्या दावणीला बांधले आहे, आमदार होण्यासाठी ते महामंडळाचा गैरवापर करत आहेत असे अनेक आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी काही संचालकांनी केली.
राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. हा ठराव ८ विरोधात ४ मतानी मंजूर झाला. अध्यक्ष भोसले यांच्या विरोधात धनाजी यमकर, सुशांत शेलार, वर्षा उसगावकर, बाळ जाधव, पितांबर काळे, सतीश बिडकर, सतीश रणदिवे व निखीता मोघे यांनी मतदान केले. शरद चव्हाण, विजय खोचीकर, संजय ठुबे व चैत्राली डोंगरे हे भोसले यांच्या बाजूने राहिले. यानंतर उपाध्यक्ष यमकर यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आठ दिवसात नवीन अध्यक्ष व कार्यकारिणी निवड करण्यासाठी संचालकांची बैठक बोलविण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times