वाचा:
मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला श्रीनगर शहराबाहेरील एचएमटी परिसरात झाला. दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या शीघ्र कृती दलावर बेछूट गोळीबार केला. रहदारीचा भाग असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका पोहचू नये, यासाठी लष्कराच्या जवानांनी कारवाईदरम्यान संयम बाळगला. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबारात यश देशमुख यांच्यासह दोघे जवान गंभीररित्या जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वाचा:
यश देशमुख हे ११ महिन्यांपूर्वी पुणे येथे सैन्य दलात म्हणून भरती झाले होते. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते दोन महिन्यांपूर्वीच श्रीनगर येथे रूजू झाले होते. यश यांच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांच्या आईला धक्का बसला व त्या बेशुद्ध झाल्या. यश देशमुख यांच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. यश यांचे वडील शेतकरी असून, लहान भावाचे बारावीचे शिक्षण झाले आहे. यश हे अत्यंत कुटुंबवत्सल व मनमिळावू होते. घराची जबाबदारी असल्याने सवड झाली की सतत आई-वडिलांना फोन करून खुशाली विचारायचे. गावातले मित्र, शेजारी व परिचितांनाही फोन करून चौकशी करायचे. दोनच दिवसांपूर्वीच त्यांनी घरी फोन करून तब्येतीची विचारपूस केली होती. हा त्यांचा कुटुंबीयांशी शेवटचा संवाद होता. २८ तारखेला त्यांचे पार्थिव पिंपळगाव येथे आणले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
वाचा:
तेरा दिवसांत काश्मिरात महाराष्ट्रातील ४ जवान शहीद
नियंत्रण रेषेला लागून असलेल्या डावर, केरन, उरी, नौगाम या भागांना पाकिस्तानकडून १३ नोव्हेंबर रोजी लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यात नागपूर येथील भूषण रमेश सतई आणि कोल्हापुरातील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे या दोन जवानांना पाक सैन्याशी लढताना वीरमरण पत्करावे लागले होते. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी राजौरीत पाकच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील हे शहीद झाले होते. त्यापाठोपाठ आज यश देशमुख यांच्या रूपाने आणखी एक सुपुत्र काश्मिरात शहीद झाल्याने महाराष्ट्रावर खूप मोठा आघात झाला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times