पानिपतः पंजाबपासून ते हरयाणापर्यंत शेतकऱ्यांचा ( ) रोष दिसून येतोय. काही ठिकाणी गुरुवारी पोलिसांना पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झडप झाली. काही ठिकाणी पोलिसांना पाण्याचे फवारे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तरीही शेतकरी दिल्लीकडे जाण्यावर ठाम आहेत. हरयाणामधून दिल्लीला जाणारे शेतकरी दिल्लीपासून फार दूर नाहीत. शेतकऱ्यांनी आता पानिपत गाठले आहेत आणि रात्री शेतकरी पानिपतमध्ये मुक्काम करतील आणि सकाळीच दिल्लीच्या दिशने कूच करतील.

कुठल्याही स्थितीत एक दिल्लीला जाणं हे आमचं लक्ष्य आहे. रात्री पानिपतमध्ये थांबणार. उद्या पुन्हा सुरू होईल. पोलिसांनी कितीही बॅरिकेड लावली तरी ते तोडून दिल्लीत दाखल होणार. आमचा ताफा थांबणार नाही, असं भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनामसिंग चढुनी म्हणाले.

रात्रीही शेतकऱ्यांचा प्रयत्न, पोलिसांचा पाण्याचा मारा

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनीपत-पानिपत हल्दाना सीमा पूर्णपणे सील करण्यात आली आहे. दगड आणि माती टाकून पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं आहे. सोनीपतचे एसपी आणि डीसीपी यांनी स्वत: सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. शेतकर्‍यांचा रस्ता रोखण्यासाठी मातीने भरलेल्या ट्रकही उभ्या करण्यात आल्या आहेत. या सर्व कारणांमुळे सर्वसामान्यांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. दिल्लीहून अंबालाकडे जाण्यासाठी नागरिक पायीच निघाले आहेत. सामान्यांना हल्दाना सीमेपासून २० किमी चालत पानिपत गाठावं लागत आहे.

सोनीपत-पानिपत हल्दाना सीमेवर रात्री पुन्हा एकदा तणाव वाढला. पोलिसांनी लावलेली बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न शेतकरी करत होते. यामुळे पोलिस आणि शेतकरी पुन्हा एकदा आमनेसामने आले. त्यानंतर हरयाणा पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले. तर दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांनी दगडफेक सुरू केली. हल्दाना सीमेवर पंजाबहून आलेल्या शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. मात्र, पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केल्यानंतर शेतकरी मागे हटले.

शेतकरी म्हणाले – थांबणार नाही, झुकणार नाही

पंजाबमधून आलेल्या काही शेतकर्‍यांची ताफा पानिपतमध्ये थांबला नाही आणि हल्दाना पोलिस नाक्यापर्यंत पोहोचला. हे शेतकरी बॅरिकेड तोडून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सोनीपत-पानिपत सीमेवर तणावाचे वातावरण आहे. सुमारे १०० शेतकरी हल्दाना सीमेवर पोहोचले होते. ट्रॅक्टर, बस आणि त्यांच्या वैयक्तीक वाहनांसह शेतकरी हल्दाना सीमेवर पोहोचले होते.

बॅरिकेड तोडून आम्ही दिल्लीला जाऊच, असं शेतकरी म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला जाऊ. थांबणार नाही, झुकणार नाही. मोदी सरकारला जागं करणारच. पंजाबहून लाखोंच्या संख्येत शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत. रात्रीच ते दिल्ली गाठणार आहेत, असं शेतकरी म्हणाले.

उत्तर प्रदेशातील शेतकरीही रस्त्यावर उतरणार

उत्तर प्रदेशातील शेतकरीही शुक्रवारपासून रस्त्यावर उतरतील, अशी घोषणा भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. सकाळी ११ वाजेपासून मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली जातील. उत्तर प्रदेशचे शेतकरी दिल्ली-देहरादून महामार्ग रोखतील. आम्ही पंजाब, हरयाणा येथील शेतकऱ्यांसोबत आहोत. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याची आमची मागणी आहे. मुजफ्फरनगरमध्ये आयोजित महापंचायतीतील बैठकीनंतर ही मोठी घोषणा करण्यात आली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here