अहमदाबादः गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये ( ) सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल ( viral photo ) होतोय. या व्हायरल फोटोत एका अॅम्ब्युलन्समध्ये चार मृतदेह ( ) ठेवल्याचे दिसत आहे. चारही मृतदेह करोना रूग्णांचे आहेत. हे मृतदेह एकत्र स्मशानभूमीत नेण्यात आले, असं सांगण्यात येतंय.

हा फोटो खरा बरोबर असेल तर प्रश्न उपस्थित होतो. इतक्या नागरिकांचा मृत्यू होतोय की अॅम्ब्युलन्सही कमी पडताहेत? राज्य सरकार करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी लपवत आहे का? असे सवाल विचारले जात आहेत. या व्हायरल फोटोनंतर उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

त्याचवेळी धक्कादायक माहितीही समोर येत आहे. गुजरात आरोग्य विभाग करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सांगतेय आणि स्मशानभूमीकडून समोर येणारी आकडेवारी यात कुठली संख्या बरोबर आहे? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण या दोन आकड्यांमध्ये प्रचंड तफावत आहे.

गुजरातमधील दोन प्रमुख शहरे अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून नोंदवल्या गेलेल्या मृत्यूची संख्या वेगळं वास्तव दाखवत आहे. अहमदाबादमध्ये २५ नोव्हेंबरला करोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण ९० जणांवर वेगवेगळ्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर महापालिकेने दिलेल्या माहिती केवळ ९ जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय. अहमदाबादमध्ये स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागतेय, ही सध्याची स्थिती आहे.

गांधीनगरामध्येही अशीच परिस्थिती आहे. गेल्या १० दिवसांत १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत सेक्टर -३० मध्ये असलेल्या स्मशानभूमीत ११८ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण गांधीनगर महापालिकेच्या डायरीत केवळ २२ मृत्यू दाखवण्यात आले आहेत.

राज्य सरकार विरोधकांच्या निशाण्यावर

गुजरातमधील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यावरून राज्य सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. तीन महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये करोना रूग्णांची संख्या दररोज १८५० असायची आणि आजही १८५० रूग्णांची आकडेवारी जनतेसमोर ठेवली जाते. मग तीन महिन्यांपूर्वी संचारबंदी किंवा लॉकडाऊन का नाही केला? आता असं काय आहे की रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही आकडेवारी चुकीची आहे की सरकार? असा प्रश्न हार्दिक पटेल यांनी केलाय.

गुजरातमधील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सूरत, वडोदरा, अहमदाबाद आणि राजकोटमध्ये रात्रीची संचारबंदी लागू आहे.

गुजरातमध्ये करोना रुग्णांची एकूणसंख्या २ लाख ३ हजार ५०९ इतकी झाली आहे. यापैकी १४ हजार ४२९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात करोनाने एकूण ३ हजार ९२२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत १ लाख ८५ हजार १५८ रुग्ण बरे झाले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here