नारायण राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकार कोसळल्यानंतर काय होणार याचं उत्तर दिलं आहे. ‘महाराष्ट्रासाठी हे सरकार पोषक नाही. हे सरकार गेल्यानंतर दोन मार्ग आहेत,’ असं म्हणत नारायण राणेंनी सरकार कोसळल्यानंतरचे पर्याय सुचवले आहेत.
‘महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर अन्य दोन पक्षांपैकी एका पक्षासोबत युती होऊ शकते किंवा राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्याचबरोबर, राज्यात पुन्हा निवडणुका होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. शिवाय, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी समीकरण होऊ शकतं तर राज्यात कोणतंही समीकरण होऊ शकतं,’ असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
नारायण राणे यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर जोरदार शब्दांत प्रहार केला. ‘या सरकारने ६५ हजार कोटींचं कर्ज मागील सहा महिन्यात काढलं असून राज्याला दिवाळखोरीत नेलं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळाला हे दुर्दैव आहे. सामनाचे ठाकरे गद्दरी करुन मुख्यमंत्री झाले आहेत. मातोश्रीच्या पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात जाण्याची भाषा करु नका. उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर जाऊ नये विकासाच्या मार्गावर जावं,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
‘मराठ्यांना आरक्षण द्यावं असं शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना वाटत नाही. ते या विरोधात आहेत, असा आरोप करतानाच त्यांनी सर्वोच्च न्यायलयात चांगले वकील नेमण्याची गरज आहे, पण सरकारने तसे वकील दिलं नाही,’ असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times