मुंबईः राज्यात आज ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले आहेत तर आज ८५ रुग्ण करोनामुळं दगावले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात दिवाळीनंतर करोना रुग्णवाढीचे सत्र सुरुच आहे. आज दिवसभरात ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले होते. त्यामुळं करोनारुग्णांची एकूण संख्या १८ लाख ०८ हजार ५५० इतकी झाली आहे. राज्यात करोना रुग्णांची ही संख्या अधिक चिंता वाढवणारी आहे. राज्यात गेल्या सात महिन्यांपासून करोनानं विळखा घातला आहे. मध्यंतरीच्या काळात ही रुग्णसंख्येत घट झाली होती. मात्र, दिवाळीनंतर या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आजही करोनावर मात केलेल्या रुग्णांपेक्षा करोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे.

आज दिवसभरात करोनावर मात करणाऱ्या ४ हजार ०८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या १६ लाख ७२ हजार ६२७ इतकी झाली आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२. ४८ टक्के इतके झाले आहे.

राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना करोनामृतांची संख्या मात्र अद्याप कमी आहे. राज्यात आज ८५ रुग्ण दगावले आहे सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५९ टक्के इतका आहे. तर, राज्यात ८७ हजार ९६९ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ०६ लाख ३५ हजार ६०० चाचण्यांपैकी एकूण १८ लाख ०८ हजार ५५० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात ५ लाख २८ हजार ३९५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ७ हजार २४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here