म. टा. प्रतिनिधी, नगरः एका ऑडिओ क्लीपमुळे अल्प काळातच नगरमधून बदली झालेले अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. क्लीपची पडताळणी करण्यासाठी राठोड यांच्या आवाजाचे नमूने घेण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडून सुरू असलेल्या राठोड यांच्या चौकशीला वेग येणार आहे.

नांदेडहून नगरला बदली झाल्यानंतर अल्प काळातच राठोड यांची नगरहून बदली करण्यात आली. यामागे त्यांचे एका पोलिस कर्मचाऱ्यासोबत झालेल्या संभाषणाची क्लीप कारण असल्याचे सांगण्यात आले होते. पोलिस अधीक्षकांकडून या क्लीपची चौकशी करण्यात येत होती. त्यासाठी आवाजाचे नमूने घेणे आवश्यक होते. यातील पोलिस कर्मचारी संभाजी गर्जे याच्या आवाजाचे नमूने घेण्यात आले. मात्र, राठोड यांनी नमूने देण्यास नकार दिला होता. त्यामुळे पोलिस अधीक्षकांकडून न्यायालयात परवानगीसाठी अर्ज करण्यात आला. यावर जिल्हा सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्यासमोर सुनावणी झाली. राठोड यांच्यावतीने बाजू मांडण्यात आली की, या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही, आरोपपत्र नाही, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईही केलेली नाही. त्यामुळे नमूने देण्याची गरज नाही. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अड. सतीश पाटील यांनी युक्तिवाद केला. यासंबंधी काही प्रकरणांचे दाखले यांनी न्यायालयात दिले. पोलिस अधीक्षकांना अशी चौकशी करण्याचा अधिकार आहे. गुन्हा दाखल झाला नसला तरीही नमूने घेता येतात. शंका उपस्थित झाल्याने त्याचे निरसन होणे आवश्यक आहे. त्यामुळे चौकशीसाठी पोलिस अधिक्षकांना राठोड यांच्या आवाजाचे नमूने घेण्यास परवानगी द्यावी. राठोड यांनी गुन्हा केला नसेल तर त्यांनाही यासंबंधी काळजी करण्याची गरज नाही, असा युक्तिवाद अड. पाटील यांनी केला. त्यावर न्यायालयाने राठोड यांच्या आवाजाचे नमूने घेण्यासंबंधीचा पोलिस अधीक्षकांचा अर्ज मंजूर केला.

काय आहे प्रकरण?

गेल्या महिन्यात राठोड व एक पोलिस कर्मचारी यांच्यातील संभाषणाची एक क्लीप समोर आली होती. या क्लीपमध्ये राठोड हे ‘माल घेऊन येणार का कसे?’ अशी विचारणा करीत असल्याचे ऐकू येते. ही क्लिप जवळपास पाच मिनिटांची आहे. याशिवाय कोण मालदार पार्टी आहे, कोणी कोठे सेटिंग लावली आहे. यातून आपल्याला काय मिळणार वगैरे चर्चाही क्लीपमध्ये ऐकू येते. नेवासा येथील पोलिस कर्मचारी आपल्या स्थानिक अधिकाऱ्यासोबत राठोड यांना भेटण्यासाठी येत असल्याचे सांगत असून त्या दोघांत जी चर्चा झाली, ती हप्तेखोरीच्या अर्थाने झाल्याचा संशय आहे. याची प्राथमिक चौकशी करून वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आला. आता तांत्रिकदृष्टीने तपासणी करण्यासाठी आवाजाचे नमूने आवश्यक असल्याने पोलिसांनी त्यासंबंधीचे कामकाज सुरू केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here