मुंबई: प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या माहुलवासीयांना महाविकास आघाडी सरकारने काहीसा दिलासा दिला आहे. येथील प्रकल्पबाधितांसाठी सध्या उपलब्ध असलेली ३०० घरे लवकरच हस्तांतरित करण्यात येणार आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

म्हाडाकडे ३०० घरे उपलब्ध असून १ फेब्रुवारी रोजी या घरांचा ताबा मुंबई महापालिकेला देण्यात येणार आहे. ताबा प्रमाणपत्रासह ही घरे हस्तांतरित केली जाणार आहे. माहुलमध्ये अतिप्रदूषित क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना या घरांत स्थलांतरित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. म्हाडा व अन्य संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

दरम्यान, माहुलच्या नरकातून आमची मुक्तता करा अशी मागणी हजारो कुटुंबे सातत्याने करत आहेत. यासाठी विविध मार्गांनी त्यांचा लढा सुरू आहे. न्यायालयीन लढाई सुरू असताना सरकार दरबारीही सातत्याने आर्जव केले जात आहे. या प्रश्नात आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच लक्ष घातलेले आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर माहुलवासीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज झालेला निर्णय हा माहुलवासीयांसाठी पहिला मोठा दिलासा आहे.

जीवघेणे प्रदूषण

तानसा जलवाहिनी व इतर प्रकल्पांतून विस्थापित झालेल्या सुमारे साडेपाच हजार कुटुंबाचे नागरिकांचे पालिकेने काही वर्षांपूर्वी माहुलमध्ये स्थलांतर केले. प्रकल्पग्रस्त वसाहतीत पाणी, मलनि:सारण वाहिन्या व इतर पायाभूत सुविधांची वानवा असतानाच माहुल, ट्रॉम्बे भागातील प्रदूषणाची त्यात भर पडली. विषारी प्रदूषणाने नागिरकांना दमा, टीबी, श्वसनविकार व त्वचाविकाराला सामोरे जावे लागत असून, प्रदूषणामुळे आतापर्यंत १०० हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले असल्याचा दावा माहुलवासी करतात. त्यामुळे या वसाहतीत आम्हाला राहायचे नाही, येथून स्थलांतरित करा, अशी मागणी नागरिकांनी न्यायालयात केली. त्यावर न्यायालयाने नागरिकांना प्रति महिना १५ हजार रु. भाडे किंवा त्यांचे माहुलबाहेर स्थलांतर करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here