मुंबईः केंद्रीयं तपास यंत्रणांचं बळ वापरुन महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांना जेरबंद करायचे. यातून मंत्रालयाच्या पायरीवरुन पुढे सरकता येईल, असं विरोधकांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. सरकारची वर्षपूर्ती झालीच आहे. अशीच चार वर्षही पूर्ण होतील, असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील स्थापन झालेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. हे सरकार तीन महिनेही टिकणार नाही, असे दावे केले जात असतानाच सरकराला वर्ष पूर्ण झाले आहे. हाच धागा पकडत महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेनेनं हे विश्वास पाच वर्ष टिकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, महाविकास आघाडीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेनं सणसणीत टोला हाणला आहे.

शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून सरकार कोसळणार असल्याचा दावा करणाऱ्या विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. ‘आज दिल्लीत शेतकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने धडक मारली. सरकार शेतकऱ्यांना मागे रेटत आहे. त्यासाठी बळाचा वापर बेगुमानपणे चालला आहे, पण हेच ते सरकार लडाखच्या हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांना मागे रेटण्यात कमजोर पडले आहे. तिकडे चीनशी चर्चा आणि वाटाघाटी सुरु आहेत, तर दिल्लीत शेतकऱ्यांना तुडवून बाहेर फेकले जातेय. अशा प्रवुत्तीशी लढत महाराष्ट्राला पुढे जायचे आहे,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

‘तीन पक्षांचे सरकार असूनही तेथे अडचणी आल्या नाहीत, पण ‘अस्मानी’ संकटांमुळे राज्याच्या प्रगतीची गती मंदावली हे मान्य करावेच लागेल. कोरोनाने विकासाचा वेग रोखला. वर्षभरातील अर्ध्यापेक्षा जास्त कालावधी कोरोनाशी लढण्यातच गेला. आणखी किती कालावधी या विषाणूशी लढावे लागेल ते सांगता येत नाही. कोरोनामुळे जगाचेच प्राधान्यक्रम बदलले. त्यात महाराष्ट्रही आलाच. राज्यातील नागरिकांना कोरोनापासून वाचविण्यासाठी सरकारला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागले,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘विरोधी पक्ष मंत्रालयाच्या पायरीवर वर्षभरापासून उभा आहे व पुढची चार वर्षे त्यांना त्याच पायरीवर आधार घेत थांबावे लागेल. पायरी खचेल, पण तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार नाही. त्यामुळे विरोधकांनी कर्तव्याचे भान ठेवून विधायक कार्याचा मार्ग स्वीकारावा व चार वर्षांनंतर निवडणुकांना सामोरे जावे. विरोधी पक्ष सरकार खेचण्याचे जे डावपेच आखत आहे ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही. सीबीआय, ईडी, न्यायव्यवस्थेवर दबाव टाकून राजकारण करणे हे धोकादायक आहे. अशा यंत्रणांचा गैरवापर करून सरकारे पाडणे अथवा बनवणे म्हणजे हुकूमशाहीचेच लक्षण आहे,’ असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

हे तर छत्रपती शिवरायांचे दुर्दैव

‘महाराष्ट्र सरकारविरुद्ध भुंकणाऱ्यांना व चिवचिवाट करणाऱ्यांना सरकारी कवचकुंडले पुरविली जाताहेत. त्यांच्या बेकायदा कृत्यांवर पांघरुण घालण्यासाठी न्यायव्यवस्थेच्या चिंधड्या उडवून हवे ते केले जात असेल तर इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीविरुद्ध बोलण्याचा हक्क पुढाऱ्यांना नाही. महाराष्ट्राची तसेच मुंबईची बदनामी करणाऱ्यांचे खुले समर्थन या काळात विरोधकांनी करावे हे छत्रपती शिवरायांचे दुर्दैवच म्हणायला हवे. आज विरोधी पक्षांत सर्वमान्य नेता नाही हे खरे, पण गरज पडली व असंतोषाचा भडका उडाला तर त्यातून नेतृत्व आपोआप निर्माण होते असा जगाचा इतिहास सांगतो.’

अग्रलेखातील ठळक मुद्दे

अर्थव्यवस्थेला भोके पडली आहेत व ठिगळे जोडूनही पाय बाहेरच पडणार आहेत. महसुलात धाटा आहेच व केंद्र सरकारने सहकार्याचा हात आखडता घेतला आहे. अशा परिस्थितीत राज्याचा गाडा चालवणे सोपे नाही. विरोधी पक्षाने जो मार्ग स्वीकारला आहे तो राज्याच्या विकासाची गती पूर्णपणे रोखण्याचा आहे.

भारतीय जनता पक्षासारखे लोक दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बार उडवीत असतात. वीज बिलांसंदर्भात जे मोर्चे व सरकारी कार्यालयाची तोडफोड सुरू आहे तो त्यातलाच प्रकार आहे. वीज बिलाचा प्रश्न हा तोडफोडीने सुटणार नाही. विरोधकांनी सरकारकडे त्याबाबत ठोस प्रस्ताव ठेवला पाहिजे. केंद्राने यासाठी राज्याला भरघोस मदत केली तर वीज बिलेच काय, प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरचे कर्ज माफ करता येईल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here