म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनावरील लस तयार करणाऱ्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, शनिवारी पुण्यात येत आहेत. मात्र, विविध देशांच्या राजदूतांचा चार डिसेंबरला आयोजित केलेला दौरा रद्द करण्यात आला आहे.

‘सीरम इन्स्टिट्यूट’मध्ये अॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन घेण्यात येत आहे. यांनी या लसीचे वितरण करण्याबाबत बैठका घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी हे शनिवारी दुपारी एक ते दोन या कालावधीत ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भेट देऊन हैदराबादला जाणार होते. मात्र, त्याऐवजी ते हैदराबादहून पुण्यात येणार असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे भेटीच्या वेळेत थोडा बदल होणार आहे.’

‘या लसीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी १०० देशांचे राजदूत ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भेट देणार होते. हा दौरा चार डिसेंबरला आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा दौरा रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहितीही पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे,’ असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले.

करोनाप्रतिबंधक लशीच्या आढाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी गुजरात आणि तेलंगणच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी हे पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला भेट देतील. त्याशिवाय ते अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट देतील. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी हे हैदराबादेतील भारत बायेटक कंपनीलाही भेट देतील, असे ट्वीट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे. लसनिर्मिती, साठवणुकीची तयारी आणि नागरिकांपर्यंत लस कशी नेता येईल, यावर ते शास्त्रज्ञांशी चर्चा करणार आहेत, असेही ट्वीटमध्ये म्हटले आहे.

लॉकडाउन हे उत्तर नाही

करोना लॉकडाउनमुळे सामान्य माणसांचे आर्थिक नुकसान होते. आपल्याकडे पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येईल असे वाटत नाही. सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक असून, काही ठिकाणी निर्बंध आणावे लागतील. सरकार काळजी घेत आहे. मात्र लॉकडाउन हे सध्या तरी उत्तर नाही, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

८७ हजार रुग्णांवर उपचार

राज्यात शुक्रवारी सहा हजार १८५ नवीन करोना बाधितांचे निदान झाले असून, गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढण्याचा क्रम कायम आहे. यामुळे राज्यातील करोना बाधितांची एकूण संख्या १८ लाख ८ हजार ५५० इतकी झाली आहे. राज्यात दिवसभरात चार हजार ८९ करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ७२ हजार ६२७ करोना बाधित बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्के इतके आहे. सध्या राज्यात उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ८७ हजार ९६९ इतकी आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here