पुणे: पंतप्रधान यांनी पुणे येथे येऊन इन्स्टिट्युटला भेट दिल्यानंतर सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या भेटीविषयी माहिती दिली आहे. आजच्या भेटीत करोनावरील लस आणि लसीकरण याबाबत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सखोल चर्चा झाली, असे पूनावाला यांनी नमूद केले व करोनावरील लसीचे वितरण सर्वप्रथम भारतात होणार, अशी खूप मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली.

पंतप्रधान मोदी यांच्या सीरम भेटीविषयी अदर पूनावाला यांनी दिलेली माहिती लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या देशवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. करोनावरील लस लवकरच येणार, हेसुद्धा यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. सध्या करोना लसचाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. या चाचणीकडे आमचे लक्ष लागले आहे, असे नमूद करताना लसींच्या साठवणुकीसाठी आपल्याकडे पुरेशी आणि सक्षम व्यवस्था असल्याचे पूनावाला यांनी सांगितले. संपूर्ण भारतात या लसींचे किती डोस लागणार याबाबत लेखी स्वरूपात भारत सरकारने अद्याप काहीही सांगितलेले नसले तरी सीरमने जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी लस उत्पादित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे पूनावाला यांनी नमूद केले.

लसींबाबत देशाचं आरोग्य मंत्रालय अंतिम निर्णय घेईल. एकदा त्यावर शिक्कामोर्तब झालं की सर्वप्रथम या लसींचं वितरण भारतात करण्यात येईल. त्यानंतर कोव्हॅक्स देशांत लसपुरवठा केला जाईल. यात प्रामुख्याने आफ्रिकन देशांचा समावेश आहे. ब्रिटनसह युरोपमध्ये लस वितरणाची जबाबदारी अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड यांची असणार आहे, असेही पूनावाला यांनी नमूद केले.

लसीचा आपत्कालीन स्थितीत वापर करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून आम्ही पुढील दोन आठवड्यात अर्ज करणार आहोत. याबाबत आज पंतप्रधानांशीही चर्चा झाली, अशी मोठी माहिती अदर पूनावाला यांनी यावेळी दिली. पंतप्रधान मोदी यांच्याशी लसीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. त्यांना आधीपासूनच करोनावरील लसींबाबत बरीच माहिती असल्याचे यानिमित्ताने लक्षात आले. एकाचवेळी अनेक लसींवर काम सुरू आहे. त्या सर्वाचाच तपशील आम्ही पंतप्रधानांना दिला. कोविशिल्ड ही लस करोना संसर्गावर अत्यंत प्रभावी असल्याचा दावाही पूनावाला यांनी केला. लसीकरण कशाप्रकारे करायचे याचा कृती आराखडा तयार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांसोबत करोनावरील लसींच्या किमतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.

लस पूर्णपणे सुरक्षित

सीरमची कोविशिल्ड लस पूर्णपणे सुरक्षित आहे. ही लस घेतल्यानंतर शून्य टक्के रुग्णांना रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. तसेच ६० टक्क्यांपर्यंत संसर्गाची तीव्रता कमी होईल. लस पुरवठा आणि कोल्ड स्टोरेजसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत. त्याशिवाय जानेवारीनंतर दरमहा ५ ते ६ कोटी लस उत्पादनाची क्षमता तयार होईल, असेही अदर पूनावाला यांनी नमूद केले.

दरम्यान, ही लस नेमकी केव्हा बाजारात येणार हे मात्र पूनावाला यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे त्याबाबतची उत्सुकता पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यानंतरही कायम राहिली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here