दुसऱ्या वनडेमध्ये जर चहलला वगळले तर त्याच्या जागी दुसरा फिरकीपटू संघात येऊ शकतो. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांविरुद्ध अचूक मारा करणाऱ्या कुलदीप यादव हा भारतीय संघापुढील सर्वोत्तम पर्याय असेल. कारण कुलदीप हा चायनामन फिरकीपटू आहे आणि त्याची कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली झालेली आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात जर चहलला वगळले तर कुलदीप हा सर्वांत चांगला पर्याय भारतासाठी ठरू शकतो.
भारतीय संघात रवींद्र जडेजाच्या रुपात एक फिरकीपटू आहे, त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीनुसार संघात वेगवान गोलंदाजाला संधी देऊ शकतो, असे म्हटले जात आहे. यावेळी भारतीय संघातील दोन युवा वेगवान गोलंदाज संधीच्या प्रतिक्षेत आहेत. भारताचा युवा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही चहलच्या जागी संघात स्थान मिळू शकते. शार्दुल हा वेगाने चेंडू टाकू शकतो, त्याचबरोबर तो चांगले बाऊन्सर्सही टाकतो. त्याचबरोबर तो चेंडू चांगला स्विंगही करतो. त्यामुळे चहलच्याजागी जर वेगवान गोलंदाज खेळवायचा असेल तर भारतीय संघाकडे शार्दुल ठाकूरसारखा पर्याय उपलब्ध असेल.
चहलच्या जागी अजून एक युवा वेगवान गोलंदाज भारतीय संघाकडून खेळू शकतो आणि त्याचा हा पहिला वनडे सामना ठरू शकतो. दुसऱ्या वनडेमध्ये भारताकडून युवा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. आयपीएलमध्ये नटराजनने भेदक गोलंदाजी केली होती. या आयपीएलमध्ये यॉर्कर किंग, अशी नटराजनची ओळख झाली होती. अखेरच्या षटकांमध्ये नटराजनने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे नटराजन चांगल्या फॉर्मात असून त्याला उद्याच्या सामन्यात संधी मिळू शकते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात चहलला वगळले जाणार का आणि त्याच्याऐवजी संघात कोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times