सार्वजनिक ठिकाणी आणि बाजारांमध्ये करोनाचा संसर्ग अधिक वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे , दुकानदार तसेच मंडईतील गाळेधारकांचीही करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दादर, जोगेश्वरी, बोरिवली या भागात चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
दिवाळीतील बाजारातील गर्दी, भेटीगाठी वाढल्याने मुंबईतील करोना रुग्णांची संख्या दररोज १ हजाराने वाढली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने पालिकेने खबरदारी घेतली आहे. मास्क, सुरक्षित अंतर, हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक झाले आहे. मात्र अद्यापही मास्कविना फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. लॉकडाउन शिथिल करण्यात आल्याने सावर्जनिक ठिकाणी, बाजारांमध्ये गर्दी वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर पालिकेने २४४ ठिकाणी मोफत करोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. बाजारांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने तेथे सुरक्षित अंतराचा फज्जा उडतो आहे. त्यामुळे सर्व विभागात करोनाची मोफत चाचणी सुविधा सुरू करण्यात आली आहे. फेरीवाले, दुकानदार तसेच मंडईतील गाळेधारकांच्या चाचण्यांवरही पालिकेने अधिक भर दिला आहे. दिवाळीनंतर चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले असून दरदिवशी १५ ते १७ हजार चाचण्या केल्या जात आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चाचण्यांच्या प्रमाणात वाढ
दादरला रानडे मार्ग, वांद्रे, खार, बोरिवली पूर्व परिसर, जोगेश्वरी, दादर या ठिकाणी फेरीवाले, मंडई तसेच दुकानदारांची मोफत चाचणी सुरू करण्यात आली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात यश येत असून चाचण्यांचे प्रमाण वस्त्या आणि फेरीवाल्यांसह गर्दीच्या ठिकाणी वाढवण्यात आले आहे.
१८ लाख ५४ हजार २२३ चाचण्या
दिवाळीनंतर १४ नोव्हेंबरला चाचण्यांची संख्या १६ लाख ७९ हजार ८८८ इतकी होती. तर, २५ नोव्हेंबरला १८ लाख १७ हजार २३२ चाचण्या झाल्या. अवघ्या १२ दिवसांमध्ये तब्बल १ लाख ३७ हजार ३४४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मार्चपासून २७ नोव्हेंबरपर्यंत १८ लाख ५४ हजार २२३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times