राज्यातील सरकारला काल एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्तानं ‘सामना’त लिहिलेल्या लेखात संजय राऊत यांनी सरकार स्थापनेच्या काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. त्याचबरोबर, विरोधकांकडून घेतले जाणारे आक्षेप व केल्या जाणाऱ्या भाकितांचाही त्यांनी समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रातील सध्याचे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही असे , चंद्रकांत पाटील वगैरे नेते सांगतात. राजकारणात कुणी साधुसंत वगैरे नसतो. तसे कोणतेही सरकार हे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसते. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचा:
‘अटल बिहारी वाजपेयी यांनी ३३ भिन्न विचारांच्या पक्षांचे ‘एनडीए’ सरकार पाच वर्षे चालवले. त्यात ममता बॅनर्जी होत्या. जयललितांचा पक्षही होता. ते सरकार कुणाला अनैसर्गिक वाटले नाही. मग तिघांचे सरकार निसर्गविरोधी कसे,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
‘हे सरकार किती टिकेल अशी शंका उपस्थित करणाऱ्यांनी अमित शहा यांचे एक प्रगल्भ विधान समजून घेतले पाहिजे. ‘आघाडी सरकारमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यातील एखादा पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही, असं शहा म्हणाले आहेत. हेच सत्य असून एकही पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नाही,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर लक्ष ठेवा असे अलीकडे सातत्याने सांगितले जाते, पण आज सगळ्यात जास्त भरवशाचे तेच आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना कुरतडून काही हाती लागेल काय यावर ऑपरेशन सुरू आहे. संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज असतातच आणि इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. मंत्र्यांची व काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे. ती मुख्यमंत्र्यांनाच दूर करावी लागेल,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचा:
‘सध्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी सी.बी.आय., ईडीसारख्या यंत्रणांचा वापर सुरू आहे. बेकायदेशीर बांधकाम, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे गुन्हे करणाऱ्यांना अभय दिले जात आहे. हे सर्व राजकीय दाबदबावाचे प्रकार न्यायाचे आणि नैसर्गिक तितकेच ‘ठाकरे सरकार’ही नैसर्गिक मानावेच लागेल. एखाद्या नटीचे बेकायदेशीर बांधकाम पाडणे हे सध्याच्या काळात बेकायदेशीर ठरत आहे, तेथे बहुमतातील सरकार पाडण्याचे प्रयोग घटनाबाह्य, बेकायदेशीर आहे असे बोलणे गुन्हा ठरू शकतो. अशा प्रवृत्तीविरोधात महाराष्ट्र म्हणून लढावे लागेल,’ असा टोलाही त्यांनी हाणला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times