राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असतानाच अचानक एका पहाटे अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी महाराष्ट्रानं पाहिला होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणातून अजित पवार यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा तेव्हा होती. सुप्रिया सुळे यांनी पक्ष आणि कुटुंब फुटल्याचं ट्वीट करत त्यावर शिक्कामोर्तबही केलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या भाजपसोबत न जाण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळं अजित पवारांना माघार घ्यावी लागली. कालांतरानं राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार आलं.
वाचा:
आता या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही विरोधकांकडून त्याच्या भवितव्याविषयी शंका उपस्थित केल्या जातात. अनेकदा या शंका उपस्थित करताना अजित पवार यांच्याकडं अंगुलीनिर्देश केला जातो. पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्वीटमुळं त्यात अधिकच भर पडली होती. अलीकडंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत एक वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांना संधी मिळाल्यास ते अजित पवारांऐवजी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील, असं पाटील म्हणाले होते. त्यातून उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं.
त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपल्या लेखात अजित पवारांबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. ‘अजित पवार यांच्यावर लक्ष ठेवा असं अलीकडं सातत्यानं सांगितलं जातं, पण आज सगळ्यात जास्त भरवशाचे तेच आहेत,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times