देशात वाढत असल्याच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात असतानाच, सन २०२० मध्ये बेरोजगारीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. यंदा जागतिक बेरोजगारीमध्ये २५ लाखांनी भर पडणार असून सुमारे ५० कोटी लोक अल्प मोबदल्यात काम करीत असल्याचे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा (आयएलओ) ‘द वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आऊटलूक : ट्रेंड्स २०२०’ हा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला. गेली नऊ वर्षे जागतिक बेरोजगारीचे प्रमाण बहुतांश स्थिर आहे. मात्र जागतिक आर्थिक वाढ मंदावली आहे. याचाच अर्थ जागतिक स्तरावर कामगारांचे प्रमाण वाढत आहे, परंतु आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या रोजगारक्षम तरुणांसाठी पुरेशी नवीन रोजगार निर्मिती होत नाही, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणून यंदा जागतिक बेरोजगारी सुमारे २५ लाखांनी वाढणार असल्याचा अंदाज ‘आयएलओ’ने वर्तवला आहे. ‘आयएलओ’ ही संयुक्त राष्ट्रांची संघटना असून, आंतरराष्ट्रीय कामगार मानकांची स्थापना करून साजेशा रोजगारास चालना देणे आणि सामाजिक न्याय वाढविणे हे या संघटनेचे प्रमुख कार्य आहे.
अहवालातील निष्कर्षानुसार, विकसनशील देशांमध्ये सन २०२०-२१ मध्ये बेरोजगारी प्रचंड वाढणार आहे. यामुळे सन २०३० पर्यंत जगभरातून गरिबीचे उच्चाटन करण्याच्या मोहिमेत अडथळे निर्माण होणार आहेत.
बेरोजगारीचे प्रमाण
जगभरातील बेरोजगार : १८ कोटी ८० लाख
पुरेसा पगार न मिळणारे : १६ कोटी ५० लाख
रोजगाराचा शोध थांबवलेले किंवा रोजगारच न मिळालेले : १२ कोटी
एकूण : सुमारे ४७ कोटी
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times