लखनऊ: शेतात काम करत असताना एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजनेअंतर्गत ही मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्याचा दुर्घटनेत मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास मदत दिली जाणार आहे.

या योजनेनुसार, शेतात काम करत असताना किंवा त्याच्या कुटुंबातील कुणाचाही एखाद्या दुर्घटनेत मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त, शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व आल्यास २ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेत १८ ते ७० वर्षांपर्यंतचे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश करण्यात आला आहे.

सुमारे अडीच कोटी लोकांना मिळणार फायदा

उत्तर प्रदेशातील सुमारे २ कोटी ३८ लाख २२ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. यात खंडाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजनेअंतर्गत राज्याच्या सीमेत काम करणारे शेतकरी, छोटे शेतकरी, मध्यम शेतकरी, आणि मोठी शेती असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे, असे मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री आणि प्रवक्ता श्रीकांत शर्मा यांनी सांगितले.

या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १३ निर्णय घेण्यात आले. या बरोबरच सन २०२०-२१ साठी नव्या उत्पादन शुल्काबाबतच्या धोरणाचीही घोषणा करण्यात आली. या अंतर्गत नव्या परवाना शुल्काबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार देशी दारूसाठी १० टक्के, विदेशी दारूसाठी २० टक्के आणि बीयरसाठी १५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here