‘केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजक, बॉलिवूड यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र मागील काही महिन्यापासून केले जात असल्याचे उघड झाले आहे. एनसीबीच्या माध्यमातून बॉलिवूडला बदनाम करण्याचे प्रयत्न सुशांतसिंग प्रकरणापासून कसे केले जात आहेत हेही स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या मोहिमेत योगी आदित्यनाथ यांचाही पुढाकार राहिलेला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न २०१४ पासूनच होतो आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असेच षडयंत्र करुन गुजरातला नेले गेले. आता बॉलिवूडचे महत्व कमी करुन उत्तर प्रदेशमध्ये दुसरा चित्रपट उद्योग निर्माण करण्याचा डाव आहे, असा दावा त्यांनी केला.
‘आदित्यनाथ यांच्या मुंबई भेटीत ते अशीच भीती दाखवून महाराष्ट्रातील गुंतवणूक व बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्यासाठी घाट घालतील. महाराष्ट्राची अधोगती करण्याचा त्यांचा कुहेतू लक्षात घेऊन मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच महाविकास आघाडी सरकारने उद्योगपती व बॉलिवूडच्या पाठीशी खंबरपणे उभे राहण्याची गरज आहे,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.
‘योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशात कायदा सुव्यव्यस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. दलित, महिला, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढल्याचे देशाने पाहिले आहेत. दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत. सामाजिक एकोपा राहिलेला नसून उत्तर प्रदेश हे उत्तम प्रदेश नसून जंगलराज झाले आहे. आदित्यनाथ यांच्यामुळे विद्वेषाचे वातावरण उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झाले आहे. आता केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातील वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असेही सावंत म्हणाले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील उद्योजकांमध्ये षडयंत्राने दहशत निर्माण करण्याऐवजी स्वतःच्या राज्यात उद्योगांकरिता अनुकूल वातावरण तयार करावे, असा सल्लाही सावंत यांनी दिला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times