म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
करोनाकाळामध्ये सर्वत्र निराशेचे मळभ दाटून आलेले असतानाच, मनाला दिलासा देणारी एक घटना घडली आहे. केईएम रुग्णालयाच्या यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागल्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या यांच्या मुलाचा, प्रिन्सचा त्यात होरपळून मृत्यू झाला होता. मात्र राजभर कुटुंबाच्या घरी पुन्हा आनंद परतला आहे. तान्हुल्या प्रिन्सला गमावल्याची वेदना सहन करणाऱ्या या दाम्पत्याला पुन्हा बाळ झाले आहे.

पन्नालाल राजभर यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. उत्तर प्रदेशात राहणाऱ्या या दाम्पत्याने वर्षभरापूर्वी त्यांच्या या बाळाला केईएम रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारासाठी आणले होते. प्रिन्सला हृदयदोष असल्यामुळे त्याला येथे आणण्यात आले होते. त्यावेळी यंत्रातील तांत्रिक बिघाडामुळे लागलेल्या आगीमध्ये प्रिन्स होरपळला होता. त्यातून पुढे गुंतागुंत निर्माण होऊन त्याचा मृत्यू झाला होता.

उत्तर प्रदेशला परतलेल्या या कुटुंबाच्या संपर्कात ‘मटा’ सातत्याने होता. पन्नालाल यांची नोकरी सुटली होती. ते पुन्हा थोडीबहुत शेतीची कामे करत होते. ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांच्या पत्नीने या बाळाला जन्म दिला. प्रिन्सच्या आठवणीमध्ये व्याकूळ झालेल्या या पालकांना या बाळाच्या रूपाने आनंदाची ठेव गवसली आहे. प्रिन्सच्या आठवणीशिवाय एक दिवसही जात नव्हता. पत्नीच खूपवेळा समजून काढूनही ती बाळाच्या आठवणीत दुःखीकष्टी व्हायची.

प्रिन्स राजभरच्या प्रकरणामध्ये भोईवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र या प्रकरणामध्ये गुन्हा घडला खरा, मात्र हा गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता नसल्याने हा गुन्हा कायमस्वरूपी तपासावर ठेवून शोध न लागलेल्या सदराखाली नमूद करण्यात आल्याचे नोंदवण्यात आले.

‘डोळ्यात तेल घालून जपतो…’

‘प्रिन्सला निरोप देताना काळजावर दगड ठेवून ही वेदना सहन केली. त्या आठवणीही नको वाटतात,’ असे पन्नालाल कातर स्वरात सांगतात. ‘आता मात्र या बाळाच्या जन्माने सारे मळभ दूर झाले आहे. करोनाकाळामध्ये अधिक काळजीपूर्वक आईची आणि बाळाची काळजी घेतली,’ असे पन्नालाल आवर्जून सांगतात. प्रिन्सच्या मृत्यूनंतर इतका जबरदस्त आघात मनावर झाला होता की त्यातून सावरायला खूप दिवस जावे लागले. या बाळालाही डोळ्यात तेल घालून जपतो, असेही ते आवर्जून सांगतात. राजभर यांनी या बाळाचे नाव त्यांनी ‘शशांक’ असे ठेवले आहे. त्यांच्या आयुष्याला आता पुन्हा ध्येय मिळाले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here