काल, सोमवारी रात्री आठच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे धारदार शस्त्राने रेखा जरे यांची गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी आज, मंगळवारी पहाटे सुपा पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी रेखा जरे यांची आई सिंधुबाई सुखदेव वायकर यांनी फिर्याद दिली आहे.
रेखा जरे, त्यांचा मुलगा, त्यांची आई तसेच त्यांची एक मैत्रीण पुण्यावरून काम उरकून नगरला येत असताना जातेगाव घाटात एक दुचाकी त्यांना आडवी आली. यावेळी या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. याचवेळी एकाने धारदार शस्त्र काढत जरे यांच्या गळ्यावर वार केला व हल्लेखोर निघून गेले. या हल्ल्यात जरे या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत जरे यांना त्यांच्यासोबत असलेल्यांनी कारमध्ये बसवले व कार नगरच्या दिशेने घेतली. सुपा टोल नाक्यावर एक रुग्णवाहिका भेटल्यावर त्यामध्ये रेखा जरे यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांचा तपास सध्या तीन अँगलने सुरू असून तपासासाठी सहा पथके रवाना करण्यात आली आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी याला दुजोरा दिला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times