मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूड व राज्याच्या राजकारणातही मोठा वादंग निर्माण झाला. या प्रकरणात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा हात असल्याचे आरोपही सातत्याने होऊ लागले होते. या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी एक निवेदन जारी करत हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तरीही सुशांतसिंह प्रकरणावरील आरोपांचे सत्र सुरुच होते. या सर्व प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा विरोधकांना उत्तर दिलं आहे.

सुशांतसिंह राजपूतनं आत्महत्या केल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटले. सुशांतच्या आत्महत्येचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवरही यादरम्यान प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच, आदित्य ठाकरेंवरही अप्रत्यक्षरित्या आरोप करण्यात आले होते. या सगळ्यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

गेल्या एका वर्षात तुमच्यावर विरोधकांनी आरोप केले, यावर आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. ‘त्याच्याकडे दुर्लक्ष करणं जास्त योग्य असल्याचा मी विचार केला. कामावर संपूर्ण लक्ष केंद्रीत केल्यामुळं त्याकडे लक्ष दिले नाही. टीका करणं हे विरोधी पक्षाचं कामच आहे. महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करतेय म्हणूनच माझ्यावर वैयक्तिक आरोप आणि चुकीचे आरोप करण्यात आले,’ असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

बॉलिवूड आणि मुंबई पोलिसही या वादाचं केंद्र ठरलं, तेव्हाही तुमचं नाव या जोडण्यात आलं, या प्रश्नावर उत्तर देताना, ठाकरेंनी ‘जेव्हा त्यांचं सरकार होतं तोपर्यंत सर्वकाही व्यवस्थित होतं असं त्यांना वाटत होतं. विमान भरुन दिल्लीला कार्यक्रमांसाठी जात होते. त्यांच्यासाठी गाणी गात होते. त्यांच्याशी चांगले संबंधही होते. पण, सरकार गेल्यापासून त्यांना मुंबई पोलिस वाईट वाटू लागले. बॉलिवूड, मुंबईचे लोक वाईट वाटू लागले. मुंबईचा उल्लेख ड्रग्ज सेंटर म्हणून करण्यात आला. सरकार बदलल्याने त्यांच्या चश्म्याचा नंबरही बदलला. मुंबई, महाराष्ट्रात होणाऱ्या चांगल्या गोष्टींमुळं वाईट वाटत असून आरोप करत सुटले आहेत,’ असा टोला हाणला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here