‘शिवसेनेत प्रवेश करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. त्यावेळी त्यांनी अतिशय सुंदर गोष्ट सांगितली ती म्हणजे ‘महाराष्ट्राची परंपरा इतकी मोठी आहे की त्यामुळं विधान परिषदेचा सांस्कृतिक आणि सामाजिक दर्जा वाढावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. या जागा आणि भवनापर्यंत जाण्यासाठी लोकांना खूप मोठा प्रवासा करावा लागतो. त्यामुळं याचा दर्जा कुठेतरी वाढवला गेला पाहिजे. त्याकरता तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं उर्मिला यांनी सांगितलं आहे.
‘उद्धव ठाकरेंचे हे विचार मला त्यावेळी पटले. विधान परिषदेसारख्या जागांवर महाराष्ट्र राज्य सगळ्यात पुढे आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझा विचार केला त्यामुळं मी स्वतःला खूप भाग्यवान समजते,’ असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
‘राज्यपाल नियुक्त जागासाठी माझं नाव सुचवलं आहे. पण मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. माझ्यावर पक्षात प्रवेश करण्याची कोणताही दबाव नव्हता पण मला काम करण्याची इच्छा असल्यानं मी आज पक्ष प्रवेश केला,’ असं उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केलं आहे.
करोना संकटात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सांभाळला
‘करोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं आहे. कुटुंबप्रमुखाप्रमाणे ते सगळ्यांना समजावत आहेत त्यांच्या या कामामुळं मी प्रभावीत झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी इच्छा आहे,’ असंही त्या म्हणाल्या आहेत.
‘मी सिनेसृष्टीत कारकीर्द सुरु केली तेव्हा मी साध्यासुध्या मराठी घरातून आलेली मुलगी आहे. मी पिपलमेड स्टार आहे त्याचप्रमाणे मी पिपलमेड लीडर व्हायला आवडेल, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकारने वाखणण्याजोगे काम केलं आहे,’ असं कौतुकही त्यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times