चाहत्यांनी वर्गणी करून आणलेला पुष्पगुच्छ, शीतपेयाची बाटली आणि शेतातून आणलेली सीताफळं यांची भेट पवार यांना भावूक करून गेली आहे. ‘सहजासहजी असं प्रेम कुणालाही मिळत नाही, पण याबाबतीत मी खूप नशीबवान आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रवादीचे युवा नेते म्हणून पवार यांच्यावर विधानपरिषदेसाठीच्या शिक्षक, पदवीधर आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी होती. यासाठी त्यांनी सोलापूर, जालना, बुलडाणा, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या दौरा केला. प्रचार आणि राजकीय दौरा असला तरी यानिमित्त भेटणाऱ्या लोकांच्या भावना पवार यांनी टिपल्या आहेत.
त्यांनी म्हटलं आहे, ‘या दौऱ्यात अनेक लोकं मला भेटली. काहीजण वेगवेगळ्या कामानिमित्ताने भेटले तर काहीजण सदिच्छा भेटीसाठी आले होते. एक गोष्ट मात्र माझ्या निदर्शनास आली ती म्हणजे काहीजण भेटीच्या आंतरिक ओढीने आले होते. माझ्याकडं त्यांचं काही काम नव्हतं आणि पुढंही असेल की नाही माहीत नाही, पण त्यांना मला भेटायचं होतं, माझ्याशी बोलायचं होतं, माझ्यासोबत फोटो काढायचा होता, अन मला प्रेमाची भेट द्यायची होती. त्यापैकी जालना इथं काही मुलं भेटायला आले तेंव्हा त्यांनी अगदी १०-१० रुपये जमा करुन माझ्यासाठी बुके आणला होता. वास्तविक तो बुके किती रुपयांचा हे महत्त्वाचं नाही तर तो घेताना त्या मुलांनी केलेली तडजोड आणि त्यांची भावना माझ्यासाठी लाख मोलाची आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
एका मुलाने माझ्यासाठी शीतपेयाची बॉटल आणली होती. या मुलांचं हे वेडं प्रेम मी कधीही विसरू शकत नाही. एकाने तर माझ्यासाठी शेतातली सीताफळं आणली. सहजासहजी असं प्रेम कुणालाही मिळत नाही, पण याबाबतीत मी खूप नशीबवान आहे.’हा अनुभव सांगून पवार पुढे म्हणतात, ‘अनेकदा मला विचारणा होते की, लोकांसाठी इतका वेळ कसा काढता, याची प्रेरणा कुठून मिळते? तर ही प्रेरणा अशाच प्रसंगांतून मिळत असते आणि फक्त प्रेरणाच नाही तर माझ्यावरील जबाबदारीची जाणीवही यामुळं अधिक घट्ट होत असते.’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times