कॅनबेरा, : : तिसऱ्या एकदिवसीय सामन्या भारताने ऑस्ट्रेलियावर अखेर विजय साकारला. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत भारतीय संघाला जे ऑस्ट्रेलियामध्ये करता आले नव्हते ते विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने करून दाखवले आहे.

गेल्या १२ वर्षांमध्ये भारतीय संघ कॅनबेराच्या मानुका ओव्हल मैदानावर आपला तिसरा सामना खेळत होता. पण आतापर्यंत भारताला या मैदानात एकही विजय मिळवता आलेला नव्हता. त्यामुळे भारताने या सामन्यात तब्बल १२ वर्षांनी पहिला-वहिला विजय मिळवलेला आहे. भारताने आजच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी दमदार विजय साकारला. भारताने वनडे मालिका यापूर्वीच गमावली होती. पण या सामन्यात विजयासह इतिहास रचल्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी भारताला कोणत्या संघाबरोबर पराभूत व्हावे लागले होते, पाहा….

या मैदानात भारताचा पहिला सामना २००८ साली श्रीलंकेबरोबर झाला होता. पावसामुळे हा सामना २९ षटकांचा खेळवण्याचे ठरले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना २९ षटकांमध्ये १९५ धावा केल्या होत्या. भारताकडून रोहित शर्माने या सामन्यात सर्वाधिक नाबाद ७० धावांची खेळी साकारली होती. रोहितच्या या खेळीमुळेच भारताला श्रीलंकेला १९६ धावांचे आव्हान देता आले होते. पण भारताच्या डावानंतर पुन्हा एकदा पाऊस पडला आणि षटके कमी करण्यात आली. अखेर श्रीलंकेने डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारतावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २०१६ साली या मैदानात पहिला सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३४८ धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी आरोन फिंचने १०७ धावांची खेळी साकारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन या दोघांनीही शतके झळकावली होती. पण भारताला आव्हानाचा पाठलाग करताना ३२३ धावाच करता आल्या आणि त्यांना २५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपली लाज राखली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला गेल्या सहा सामन्यांमध्ये मिळालेला हा पहिला विजय आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताने या सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला. भातीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या दौऱअयातील हा पहिला विजय आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here