म. टा. प्रतिनिधी, नागपूर: अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावाने बनावट देयके सादर करून ४९.१९ कोटी रुपयांच्या (आयटीसी) मिळविणाऱ्या एका कंपनीच्या संचालकाला जीएसटी महासंचालनालयातील गुप्तचर विभागाच्या (डीजीजीआय) झोनल युनिटने अटक केली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत, त्याला ८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात अवैधरित्या इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत नोव्हेंबर महिन्यामध्ये एका आठवड्यात चाळीसहून अधिक जणांना अटक करण्यात आली. ती कारवाई अजूनही सुरू आहे. नागपूर युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. आरोपीने विविध शहरांत बांधकाम कराराची सेवा दिल्याचे कागदोपत्री सादर केले. त्या अनुंषगाने बनावट कागदपत्रे जीएसटी पोर्टलवर दाखल करण्यात आली.

आरोपीचा जीएसटीआयएन (वस्तू व सेवा कर ओळख नंबर) नागपूर येथे नोंदणीकृत होता. त्या आधारे वेगवेगळ्या शहरांमध्ये शोधमोहीम सुरू झाली. जीएसटीआयएन दिलेल्या कंपनीच्या आजी-माजी मालकांचा शोध घेत त्यांच्या प्रतिष्ठानांची झडती घेण्यात आली. तपासादरम्यान कंपनीच्या जीएसटीआयएनचे अस्तित्व प्रत्यक्षात नसल्याचे दिसून आले. संपूर्ण कारभार हा बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षरीच्या आधारे होत असल्याची बाब पुढे आली. प्राप्त माहितीनुसार, या रॅकेटमध्ये अन्य आरोपींचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आरोपीला छत्तीसगडमधून अटक

देशभरातील विविध शहरांतून कंपनीच्या नावाने कारभार सुरू होता. खोटी कागदपत्रे सादर करून परतावा मिळविण्यात येत होता. मात्र, अस्तित्वात नसलेल्या जीएसटीआयएनच्या सहाय्याने आरोपीला छत्तीसगड येथून अटक करण्यात आली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here