म. टा. प्रतिनिधी, नगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

फिरोज शेख, गुड्डू शिंदे व आदित्य चोळके अशी आरोपींची नावे आहेत. रेखा जरे प्रकरणात पोलिसांनी काल, मंगळवारी विविध ठिकाणांहून तीन आरोपींना अटक केली होती. या तिघांना आज, बुधवारी दुपारी पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. मनिषा डुबे यांनी आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने तिघांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

‘त्या’ दिवशी काय घडलं?

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. मारेकऱ्यांच्या शोधासाठी सोमवारी रात्रीपासून सहा पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरून पोलिसांनी मारेकऱ्यांचा श्रीरामपूर व राहाता परिसरात शोध घेतला. अखेर राहाता तालुक्यातील कोल्हार परिसरात मंगळवारी रात्री दोघांना; तर कोल्हापूर येथून एकाला अटक केली. कारला कट मारल्याचा कारणावरून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र जरे यांची हत्या ही सुपारी देऊनच केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here