येमेनः गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून येमेन या आखाती देशात कैदेत असलेल्या २० जहाज कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. यात १४ भारतीयांचा समावेश होता. तर ५ बांगलादेशी व एका इजिप्शियन नागरिकाचा समावेश होता. या सर्वांच्या सुटकेसाठी दुबईस्थित मराठी उद्योजक डॉ. धनंजय दातार यांनी सातत्याने पाठपुरावा करून सोडण्यात आलेल्या १४ भारतीय कर्मचाऱ्यांना मदत म्हणून प्रत्येकाच्या बँक खात्यात २० हजार रुपये हस्तांतर केले आहे. चालू आठवड्याच्या अखेरीस हे १४ भारतीय एडन शहरामार्गे मुंबईला परतणार आहे. येमेनमध्ये सध्या भारताचा दूतावास नसल्याने शेजारच्या जिबोती या देशातील भारतीय दूतावास या कर्मचाऱ्यांना तात्पुरते पासपोर्ट तसेच येमेनी प्रशासनातर्फे व्हिसा मंजुरी मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील आहे.

ओमानस्थित एका शिपिंग कंपनीत काम करण्यासाठी हे २० जण गेल्या जानेवारीत मस्कतला गेले होते. कंपनीला सौदी अरेबिया देशाचे वाहतुकीचे कंत्राट मिळाल्याने ते दोन जहाजांतून ३ फेब्रुवारीला ओमानहून सौदी याम्बो बंदरापर्यंत प्रवासासाठी रवाना झाले. वादळी हवामानामुळे खवळलेल्या समुद्रात यातील एक जहाज १२ फेब्रुवारीला बुडाले होते. वाचलेल्या दुसऱ्या जहाजातून सर्वजण पुढे निघाले. परंतु लवकरच त्या जहाजालाही खराब हवामानामुळे नांगर टाकून एका जागी थांबावे लागले. दुर्दैवाने त्यांनी जहाज नांगरलेली जागा येमेनच्या युद्धप्रवण क्षेत्रात होती. येमेन व सौदी अरेबियात संघर्ष व चकमकी सुरू असल्याने येमेनी तटरक्षकांनी जहाजावर इशारादर्शक गोळीबार केला आणि नंतर सर्व कर्मचाऱ्यांना अटक करुन येमेनच्या साना शहरातील एका हॉटेलात स्थानबद्ध केले. त्यांचे पासपोर्ट, मोबाईल, कागदपत्रे व रोख रक्कम जप्त केले होते.

जहाज कंपनीचे मालक व एजंट आपली सुटका करतील या आशेवर या सर्वांनी सहा महिने साना शहरात काढले, परंतु काहीच हालचाल होत नव्हती. मोबाईल जप्त केल्याने कुटुंबाशी संपर्कही साधता येत नव्हता. अलिकडेच काही दिवसांपूर्वी त्यांना मोबाईल परत देऊन संपर्काची परवानगी देण्यात आली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या हालअपेष्टांचे वृत् आखाती देशातील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले. या कर्मचाऱ्यांनी आपल्या मित्रांमार्फत दुबईस्थित उद्योजक डॉ. धनंजय दातारांशी संपर्क साधून आपली व्यथा सांगितली. डॉ. दातार यांनी पुढाकार घेऊन जिबोती येथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून पाठपुरावा केला. याकामी त्यांना जिबोतीतील भारतीय राजदूत अशोक कुमार, पुण्यातील धनश्री पाटील व परराष्ट्र सेवेतील माजी ज्येष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे तसेच दुबई स्थित डॉ. सुनील मांजरेकर यांनीही सहाय्य केले. अखेर गेल्या आठवड्यात या सर्व कर्मचाऱ्यांची सुटका झाली असून ते आता जिबोतीमधील भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली आहेत. भारतीय दूतावासाच्या मदतीने व्हिसा व अन्य मंजुरी मिळताच ते लवकरच सानाहून एडनमार्गे मुंबईला परततील.

जहाज कर्मचाऱ्यांतील भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरचे संदीप बाळू लोहार (खडकेवाडा, ता. कागल), नीलेश धनाजी लोहार (कौलव, ता. राधानगरी), फिरोज नसरुद्दीन झारी (रत्नागिरी), अहमद अब्दुल गफूर वाकणकर (दापोली), तन्मय राजेंद्र माने (मांडवा, अलिबाग), दाऊद महमूद जोवरक (दापोली, मंडणगड), गोव्यातील चेतन हरिश्चंद्र गवस, तमीळनाडूमधील मनिराज मरीप्पन, मोहनराज थानीगचलम व विल्लीयम निकामदेन, पुदुच्चेरीमधील प्रवीण थम्मकरनताविडा, केरळमधील अब्दुल वाहब मुस्तहबा व पश्चिम बंगालमधील हिरोन शेक, उत्तर प्रदेशमधील संजीव कुमार यांचा समावेश आहे.

यावर प्रतिक्रिया देताना नीलेश लोहार म्हणाले, ‘काहीही चूक नसताना अटक होणे, दहा महिने स्थानबद्ध राहणे, कुटुंबाशी किंवा स्वदेशाशी संपर्क न होता अनोळखी देशात उपासमारीत दिवस काढणे आणि अनिश्चिततेची तलवार डोक्यावर असणे हा साराच अनुभव फार भीतिदायक होता. आमची कागदपत्रे, मोबाईल, घरुन वाटखर्चासाठी नेलेली रोख रक्कम जप्त झाली होती. वारंवार तपशीलवार माहिती देऊनही सतत तेच ते प्रश्न विचारुन चौकशी होत होती. नऊ महिने आमचे जेवणाचे खूप हाल झाले. या नोकरीसाठी आमच्यातील प्रत्येकाने एजंटला एक लाख ते तीन लाख रुपयांपर्यंत रक्कम कशीबशी जमवून दिली होती. कंपनीने तर आजवर काहीही पगार दिलेला नाही. सुटका होताना आम्ही अक्षरशः कफल्लक झालो आहोत. डॉ. धनंजय दातार यांनी आम्हाला परतीच्या प्रवासासाठी आर्थिक आधार पुरवला आहे. त्यांचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. सुटकेनंतर आता आम्ही जिबोतीमधील भारतीय दूतावासाच्या देखरेखीत येमेनमधील साना शहरात सुरक्षित आहोत. त्यांच्या पाठपुराव्याने व्हिसाचे काम लवकर झाले तर आम्ही पुढच्या काही दिवसांत भारतात परत येऊ. आम्हालाही घरच्या लोकांना भेटण्याचे वेध लागले आहेत.’

डॉ. धनंजय दातार यांनीही या कर्मचाऱ्यांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘आतापर्यंत करोनाच्या साथीमुळे आखाती देशांत अडकलेल्या ५००० हून अधिक भारतीयांना आमच्या अल अदील कंपनीने सर्व खर्च उचलून सुखरुप घरी पोचवले आहे. सौदी अरेबियातही तुरुंगवासात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. कोणतीही चूक नसताना आपल्या भारतीय बांधवांना परदेशी भूमीवर हालअपेष्टा सहन करत अडकून पडणे मला पटत नाही. सध्याच्या आव्हानाच्या काळात प्रत्येकाने आपल्या कुटुंबासमवेत सुरक्षित व समाधानी असावे याच अपेक्षेने आम्ही या मोहिमेत सक्रिय आहोत. जिबोतीमधील भारतीय राजदूत अशोक कुमार आणि निवृत्त भारतीय राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी केलेल्या मदतीबद्दल मी त्यांचा विशेष आभारी आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीने पगाराची काहीही रक्कमही दिलेली नाही. त्यांचे न्याय्य देणे मिळवून देण्यासाठीही मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ओमानमधील कामगार मंत्रालयाशी संपर्क साधणार असून या कर्मचाऱ्यांना कायदेशीर मदत मिळवून देणार आहे.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here