भाजप मुद्द्यांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी हिंदू-मुस्लिम मुद्द्यांचा वापर करत आहे. त्यामुळेच आम्ही अमित शहा यांच्या सीएएवरील चर्चेचं आव्हान स्वीकारत आहोत, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री त्यांच्या भाषणात योग्य शब्दांचा प्रयोग करत नाहीत. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट अवस्थेत आहे आणि सरकार त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी हिंदू-मुस्लिम मुद्दा पुढे करत आहे, अशी टीकाही यादव यांनी केलीय.
या आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही सीएएवर चर्चा करण्याचं शहा यांचं आव्हान स्वीकारलं होतं. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी सीएएवर चर्चा करण्यास आपण तयार आहोत, असं सिब्बल यांनी म्हटलं होतं. तर मंगळवारी लखनऊमध्ये सीएएचं समर्थन करणाऱ्या रॅलीला संबोधित करताना अमित शहा यांनी कुणी कितीही विरोध केला तरी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मागे घेतलं जाणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. यावेळी शहा यांनी काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसला सीएएवर चर्चा करण्याचं खुलं आव्हानही दिलं होतं. ‘सीएए’वरून होणाऱ्या हिंसाचाराला हे तिन्ही पक्षच जबाबदार आहेत. या कायद्यामुळं मुस्लिमांचं नागरिकत्व जाईल असा खोटा प्रचार केला जात आहे. पण या कायद्यातील कुठल्याही कलमात तसं असेल तर मला दाखवून द्यावं. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, हिसकावून घेण्यासाठी नाही. राहुल बाबा, ममता दीदी, अखिलेश यादव यांनी आमच्याशी जाहीर चर्चा करावी, असं आव्हानही त्यांनी दिलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times