औरंगाबाद शहरातील गंजेशहिदा मशिदीच्या मागील बाजूस असलेल्या कार्यालयावर गुरूवारी सकाळी ईडीच्या पथकातील पाच ते सहा अधिकाऱ्यांनी छापा मारला. ईडीचे अधिकारी दोन वाहनांमधून बायजीपूरा भागातील पीएफआयच्या कार्यालयाकडे आले होते. या छाप्यात संबंधित अधिकाऱ्यांनी पीएफआयचे माजी जिल्हाध्यक्ष सय्यद कलीम याच्यासह सध्याचे शहराध्यक्ष इरफान मिल्ली यांच्याकडे पक्षाच्या विविध कामांची माहिती घेतली. ही कारवाई साडेदहा वाजेपासून ते साडेबारा वाजेपर्यंत सुरू होती. त्यामुळे कार्यालयाच्या समोर पीएफआयच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती. ईडीच्या पथकाने कार्यालयातील लेखा विभागाच्या फायलींसह, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची फाइल, पीएफआय कार्यालयाच्या विविध उपक्रमांच्या फाइल आणि दिल्ली दंगलीबाबत पीएफआय पक्षाने जमा केलेली कागदपत्रे, तसेच त्याबाबत दिलेल्या निवेदनाची फाइल जप्त केली.
दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास या पथकाने माजी जिल्हाध्यक्ष सय्यद कलीम याला ताब्यात घेऊन जीएसटी भवनाकडे निघून गेले. दरम्यान पीएफआय कार्यालयावर ईडीची कारवाई झाल्याची बातमी शहरात पसरताच, कार्यालयाजवळ पीएफआयच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली. ही गर्दी रोखण्यासाठी जिन्सी पोलिसांनी कार्यालयाजवळ मोठा बंदोबस्त ठेवला. औरंगाबाद सह राज्यभरातील सहा कार्यालयांवर अशा प्रकारे कारवाई झाल्याची माहिती पीएफआय कार्यालयातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.
विदेशातून आलेल्या निधीच्या विनियोगाचे प्रकरण
या प्रकरणात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआय पक्षाला विदेशातून निधी मिळत असल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या विदेशातून येणाऱ्या पैशांचा विनियोग तसेच माहिती न देण्यासह मनी लॉड्रिंगचे हे प्रकरण असल्याची चर्चा सुरू होती. मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया ईडीकडून देण्यात आलेली नाही.
पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर छापे
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या केरळ येथील मुख्यालयासह देशभरातील कार्यालयांवर गुरूवारी (३ डिसेंबर) छापे मारले. याशिवाय पीएफआयचे अध्यक्ष ओ. एम. अब्दुल सलाम यांसह नसिरूद्दीन इलामारम यांच्या मल्लापुरम येथील कार्यालयावर छापे मारण्यात आले. याशिवाय तिरूवनंतपुरममध्ये अश्रफ मौलवी यांच्यासह केरळमधील अन्य ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत. याशिवाय दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, , कर्नाटक आदी राज्यांतील विविध कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली.
दिल्ली दंगल कनेक्शन?
एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात दिल्लीतील आंदोलनानंतर या ठिकाणी मोठी दंगल उसळली होती. या दंगलीत विदेशातून मिळालेला निधी वापरण्यात आला असावा, अशी शंका संबंधित तपास एजन्सीकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचेही सांगण्यात येत आहे.
पीएफआयने केले सरकारच्या विरोधात आंदोलन
या छापेमारीनंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी रोषण गेट येथे ईडीच्या कारवाईचा विरोध करत निषेध केला. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना समजावले. या कारवाईबाबत पीएफआयचे शहराध्यक्ष इरफान मिल्ली यांनी पत्रकारांशी बोलताना, सदर कारवाई ही हेतुपुरस्सर करण्यात आली आहे. सध्या दिल्लीत कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times