रेखा जरे हत्या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी तीन आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडे चौकशी केली असता, सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार यांची नावे समोर आली. या दोघांनाही पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. या पाच जणांकडे चौकशी केल्यानंतर पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. तसे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बोठे यांना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
रेखा जरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली आहे, हे मुख्य सूत्रधाराला पकडल्यानंतरच स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून सुपारीची रक्कम ६ लाख २० हजार रूपये जप्त केली आहे. ही सुपारीची रक्कम बोठे व भिंगारदिवे यांनी मिळून दिली होती, असेही पाटील यांनी सांगितले. आज न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये या सर्व आरोपींची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
२४ तारखेला झाला होता प्रयत्न
रेखा जरे यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. सुरुवातीला त्यासाठी २४ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, २४ नोव्हेंबरला आरोपींचा डाव फसला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याला दुजोरा दिला असून, प्राथमिक तपासात ही माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात तांत्रिक माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, त्या आधारे तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times