म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरातील कारखान्यात बुधवारी संध्याकाळी व्यावसायिकाने गळफास घेत आत्महत्या केली. अजगर अली असे या व्यावसायिकाचे नाव असून याच कारखान्यात अली यांच्या दोन मुलीही मृतावस्थेत सापडल्या. मुलींची हत्या करून अली यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आर्थिक चणचण भासत असल्याने जीवन संपवत असल्याचे अली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

मालवणी परिसरात पत्नी आणि चार मुलींसह राहाणाऱ्या अली यांचा कांदिवलीच्या गणेश नगर परिसरात लोखंडी, लाकडी वस्तूंची डाय तयार करण्याचा कारखाना आहे. दोन लहान मुलींना(१२ आणि ८ वर्षं) कारखाना दाखवून आणतो, असे सांगून अली घरातून बाहेर पडले. दुपारी चार पर्यंत ते पत्नीच्या संपर्कात होते. मात्र त्यानंतर अली यांचा मोबाइल बंद येऊ लागल्याने त्यांच्या पत्नीने कारखान्याशेजारील परिचित व्यक्तींना संपर्क साधला. आवाज देऊनही कारखान्यातून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीच्या फटीतून आत पाहिले असता अली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

कांदिवली पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अली गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. १२ वर्षांची मुलगी जमिनीवर तर आठ वर्षांची मुलगी खुर्चीवर बेशुद्धावस्थेत आढळली. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तिघांना मृत घोषीत केले. अली यांच्या मुलींच्या मृत्यूचे कारण शवचिकित्सेनंतर समजू शकेल, असे प्रभारी पोलिस निरिक्षक रवी अडाणे यांनी सांगितले. घटनास्थळावरून एक चिठ्ठी हस्तगत करण्यात आली. आर्थिक चणचणीतून जीवन संपवत असल्याचे अली यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. उचलले, याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी सुरू करण्यात आल्याचे कांदिवली पोलिसांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here