नवी दिल्लीः अंमलबजावणी संचालनालयाने (ED ) गुरुवारी देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर छापे टाकले. एकूण नऊ राज्यांत एकाच वेळी २६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान यांचा समावेश आहे.

बिहारमध्ये पीएफआयचे सरचिटणीस मो. सनाउल्लाह यांच्या घरावर छापा घालण्यासाठी दरभंगाच्या शंकरपूरला पोहोचलेल्या पथकाला परतताना ग्रामस्थांनी घेरलं. छापामध्ये जप्त केलेल्या वस्तूंची यादी देण्याची मागणी त्यांनी केली. सनाउल्लाह सध्या कोलकात्यात आहेत. याची माहिती मिळताच त्यांना कोलकात्यातील पीएफआय कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं.

पूर्णियामध्येही चौकशी

ईडीची टीम बिहारमधील पूर्णिया येथेही पोहोचली. येथील पीएफआय कार्यालयात मनी लाँड्रिंगबाबत चौकशी केली गेली. विदेशातून पैसे येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. इथंही ईडीच्या पथकाला विरोधाचा सामना करावा लागला.

दिल्लीतील हिंसाचाराशी कनेक्शन

उत्तर प्रदेशमधील लखनऊ आणि बाराबंकी येथे ईडीच्या पथकाने छापे टाकले. दिल्लीत झालेल्या दंगलीचे पीएफआय कनेक्शन उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती ईडीच्या कार्यालयाकडून देण्यात आली. या प्रकरणात लखनऊमधून अटक केलेला नदीम हा बाराबंकीचा रहिवासी आहे. त्याच्याशी संबंधित असलेल्यांचा शोध घेतला जातोय.

हाथरस घटनेत मथुरा येथून पकडलेल्या पीएफआयच्या सदस्यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मथुरामध्ये पकडलेला सदस्य हा पीएफआयच्या दिल्ली युनिटमध्ये आहे. मथुरामध्ये अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी एक आरोपी दिल्ली युनिटचा अधिकारी आहे. तो केरळ आणि इतर राज्यांमधील सदस्यांच्या संपर्कात होता.

जयपूरमध्ये ५ तास कारवाई

जयपूरमध्ये ईडीच्या पथकाने पीएफआय कार्यालयावर सुमारे ५ तास चौकशी केली. पथक गेल्यानंतर पीएफआयच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जयपूरमधील मोती डुंगरी रोडवरील मुस्लिम शाळेच्या मागे पीएफआयचे राज्य कार्यालय आहे. सकाळी अकराच्या सुमारास ईडीची टीम तिथे पोहोचली. ही टीम दुपारी साडेतीन वाजता परत आली. येथून काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

शेतकरी आंदोलनावरून लक्ष वेधण्याचा प्रयत्न

संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या घरावर ईडीचा छापा हा शेतकऱ्यांच्या आंदोवरील लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. भाजप सरकार अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. अशी कारवाई न्यायासाठी आवाज उठविण्यापासून रोखू शकत नाही, असं एक निवेदन जारी करून लखनऊमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सरचिटणीस मोहम्मद शाकिफ यांनी म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here