गुरुबाळ माळी, कोल्हापूर: राज्यातील देवस्थान समित्या बरखास्त करून तेथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्णी लावण्यात येणार आहे. त्यानुसार आघाडीने महामंडळे वाटून घेतल्या असून त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राष्ट्रवादी पक्षाला मिळणार आहे. मुंबईतील सिद्धविनायक सेनेकडेच राहणार असून याशिवाय पंढरपूरची समितीदेखील याच पक्षाला देण्यात येणार आहे. विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच या महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत. यामुळे त्यावर वर्णी लागावी म्हणून इच्छूकांकडून सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

राज्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, सिद्धविनायक मंदिर न्यास मुंबई व विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती पंढरपूर अशी महत्त्वाची महामंडळे आहेत. या महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता येताच त्यांनी ही महामंडळे वाटून घेतली. गेल्या वर्षी महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सरकारने अनेक महामंडळे बरखास्त केली. पण देवस्थान समित्यामध्ये मात्र कोणताही बदल केला नाही. आता मात्र या समित्या लवकरच बरखास्त करण्यात येणार आहेत.

भाजपच्या ताब्यातील देवस्थान समित्या काढून घेण्यासाठी गेले महिनाभर राज्यपातळीवर हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आघाडीतील मित्रपक्षांनी या समित्या वाटून घेतल्या आहेत. त्यानुसार सिद्धविनायक व पंढरपूरची समिती सेनेकडेच राहणार आहे. पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. सध्या त्याचा कारभार सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसीकर महाराज पाहत आहेत. काँग्रेसला कोणते महामंडळ द्यायचे याबाबत सध्या अंतिम चर्चा सुरू आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हे भाजपचे आहेत. ही समिती बरखास्त करण्यात येणार असून नवीन अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. यासाठी उद्योजक व्ही.बी. पाटील, प्रताप माने व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हे भाजपचे आहेत. दोन वर्षापूर्वी या समितीची विभागणी करून करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई ही नवीन समिती स्थापन करण्यात आली. पण ती कागदावरच राहिली. आता या समितीवर पदाधिकारी नियुक्त करण्याच्या हालचाली आहेत. तसे झाल्यास ही समिती काँग्रेसकडे जाण्याची चिन्हे आहेत. यासाठी संजय डी. पाटील, माजी महापौर सई खराडे व सागर चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.

सध्याच्या समित्या बरखास्त करण्याची फाईल तयार असल्याचे समजते. नवीन समित्यांचे पदाधिकारी निश्चित होताच या समित्या बरखास्त करण्यात येणार आहेत. राज्यपालांनी विधानपरिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती करताच या समित्यांची घोषणा करण्यात येणार आहेत. सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता आहे, ती संपताच नवीन महामंडळे अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत.

देवस्थान महामंडळ व अध्यक्ष

सिद्धविनायक न्यास मुंबई.. आदेश बांदेकर

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती… महेश जाधव

विठ्ठल रूक्मीणी मंदिर समिती… गहिनीनाथ महाराज औसीकर

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here