म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः मंदिरातच चोरी करत थेट देवालाच आव्हान देणाऱ्या सहा अट्टल चोरांना कुरूंदवाड पोलिसांनी ( kurundwad police ) पकडले. त्यांच्याकडून तब्बल तीस किलो चांदी आणि २७ तोळे सोने असा १३ लाखाचा माल हस्तगत केला. महाराष्ट्र आणि कर्नाटकात गेले अनेक महिने धुमाकूळ घालत असणाऱ्या या आंतरराज्य टोळीला जेरबंद केल्याने मंदिरातील पुजाऱ्यांची चिंता मिटली आहे.

दरम्यान अटक केलेल्या आरोपींमध्ये रामा अशोक कोरवी, संदीप रवींद्र जामदार, अनिल बाबासो चौगुले ,दीपक रामू दामाने , राहुल भास्कर कांबळे व सोनार शामराव बाळू काळुंगे यांचा समावेश आहे. हे सर्व शिरोळ, इचलकरंजी परिसरातील आहेत. त्यांच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, इचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक बी.बी.महामुनी यांनी दिलेली माहिती अशी, शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील दिगंबर जैन मंदिरात नोव्हेंबर महिन्यात चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रामा कोरवी याला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले होते. त्यांनी त्यास पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याची टोळी असल्याचे उघडकीस आले. या टोळीचा कुरुंदवाड पोलिसांनी पर्दाफाश करत सहा संशयित आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तीस किलो चांदी आणि २७ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी सांगितले की, ही टोळी मंदिरातील मूर्ती व सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी करत होती. हेरवाड,बस्तवाड,खिद्रापूर, निमशिरगाव,दानोळी,भेंडवडे,मिणचे,किनी,रांगोळी कबनूर या ठिकाणच्या जैन मंदिरात व कर्नाटक राज्यातील एकसंबा येथील ज्योतिर्लिंग मंदिरात चोरी केल्याची संशयित आरोपींनी कबुली दिली आहे. दीपक दमाने हा मंदिरात चोरी केलेल्या वस्तू शामराव काळुंगे यांच्याकडे विल्हेवाट लावण्यासाठी नेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही आंतरराज्य टोळी असून यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here