नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून, मुख्य सूत्रधार फरार आहे. बोठे याचा शोध घेण्यासाठी पाच पथके पोलिसांनी रवाना केली आहेत. तसेच बोठे याच्या नावाने पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, ‘आरोपी बोठे याला पकडण्यासाठी आमची पाच पथके कार्यरत आहेत. बोठे याच्या घराची आज पुन्हा झाडाझडती घेतली असून, काही महत्त्वपूर्ण वस्तू व कागदपत्रे जप्त केली आहेत.’
संपत्तीची चौकशी करा
रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला तात्काळ अटक करून त्याच्या अवैद्य धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी करा, तसेच अवैद्य संपत्ती जप्त करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देविदास खेडकर यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times