नाशिक: वन अधिकारी असल्याची बतावणी करून वनविभागात नोकरी लावून देण्याच्या भूलथापा देत अनेकांकडे पैशांची मागणी करणारा तोतया अधिकारी वनविभागाच्या सापळ्यात अलगद अडकला. लहू साहेबराव जायभाये असे त्याचे नाव आहे. वनपरिक्षेत्राच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे.
जायभाये अधिकारी असल्याची बतावणी करत असे. नोकरी लावण्याच्या भूलथापा देत त्याने अनेकांकडे पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी वनविभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार वनविभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांनी साध्या वेशात सापळा रचला होता. त्यावेळी जायभाये हा बनावट गणवेशातच अधिकाऱ्यांच्या हाती लागला. जायभाये याच्याकडे वनविभागाचा शासकीय लोगो असलेले दोन गणवेश, बनावट शिक्के, बनावट नियुक्तीपत्र असल्याचे उघडकीस आले आहे. जायभाये आणि त्याचा सहकारी साहेबराव भावराव जायभाये यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी नांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय बोरसे यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times