वाचा:
पदवीधर आणि शिक्षकच्या पाच पैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. या विजयावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी भाजपवर टोला हाणला. बरेच वर्षे पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात एका पक्षाची मक्तेदारी होती. ती आज संपुष्टात आली आहे. पदवीधरांसोबतच शिक्षकही महाविकास आघाडीसोबत आहेत हे स्पष्ट झाले आहे. निकालाआधी बरेच वाचाळ बडबड करत होते. त्या वाचाळवीरांना जबरदस्त चपराक बसली आहे. या निकालानंतर आता मुख्यमंत्र्यांसह आमची सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकटे एकटे या, असे आव्हान दिले आहे. त्याला अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. आम्ही एकटे यायचे की आघाडी करून यायचे हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील, असे सांगतानाच माझ्यासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर खुल्या मनाने हा पराभव मान्य केला असता पण दिलदारपणा दाखवण्याची दानतच या लोकांमध्ये नाही, असा टोला अजितदादांनी लगावला. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना पराभवाच्या छायेत आहे. त्याबाबत अजित पवार यांनी खंत व्यक्त केली. अमरावतीची जागा आली असती तर आणखी समाधान मिळाले असते, असे ते म्हणाले. येणाऱ्या सर्व निवडणुका अशाचप्रकारे एकत्रित बसून व्यूहरचना आखून लढल्या जाव्यात, अशी माझी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.
वाचा:
ही महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती
विधानपरिषद निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे आभार मानले. हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावतीच आहे असे त्या म्हणाल्या. या यशासाठी कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते व आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी अहोरात्र कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटित प्रयत्नातून हा विजय साकारला आहे. या विजयाचा आम्हा सर्वांना आनंद आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.
वाचा:
सर्व स्तरांतील मतदार महाविकास आघाडीसोबत
राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील सोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध होते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले आहे. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. हा विजय महाविकास आघाडीसाठी कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना समर्पित करतानाच महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आल्यावर काय होते, हे या निकालाने दाखवून दिले आहे असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times